कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती टाळण्यासाठी धरणातील पाण्याचे आधीच नियंत्रण ! – दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर 

जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली

कोल्हापूर – दोन वर्षांपूर्वी आलेल्या पूर परिस्थितीचा अभ्यास करून मागील वर्षी धरणाच्या पाण्याचे आधीच नियंत्रण केले होते. यावर्षी त्याच पद्धतीने संभाव्य पूर नियंत्रणाचे नियोजन सर्व विभागांच्या समन्वयाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. ‘ऑनलाईन’ पद्धतीने झालेल्या या बैठकीला खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव सहभागी होते.

पाटबंधारे विभागाने मागील १० वर्षांचा अभ्यास करून पूर नियंत्रणाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या मासांच्या काळात पूर येतो. जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षात प्रत्येक विभागाचा एक प्रतिनिधी कार्यरत असतो. सातारा, सांगली येथील पाटबंधारे विभागाच्या संपर्कातही कोल्हापूर जिल्ह्याचा विभाग आहे. संभाव्य आपत्तीपासून सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याला नियंत्रित ठेवू, असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.