परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? तरीही गेली २३ वर्षे मला स्थुलातून त्यांच्या जवळ रहाण्याचे भाग्य त्यांच्याच कृपेने लाभले आणि त्यांच्या माध्यमातून स्थापन होणार्या सनातन धर्मराज्याची (हिंदु राष्ट्राची) जडण-घडण होतांना मला ‘याची देही याची डोळा’ प्रत्यक्ष पहाता आली. जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेने लिहीत आहे. १५ मे २०२१ या दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेली सार्वजनिक प्रवचने’ हा भाग पाहिला. आज त्या पुढील भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! : https://sanatanprabhat.org/marathi/476598.html
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थूलरूपातील कार्य
२८. ध्वनीचित्रीकरण सेवेची घडी बसवणे
२८ इ. दूरचित्रवाहिन्यांवरून समाजाला धर्मशिक्षण देण्यासाठी मराठी आणि हिंदी मालिकांची निर्मिती करणे : यातूनच पुढे समाजाला आधुनिक शास्त्रीय परिभाषेत अध्यात्मशास्त्र समजावण्याच्या दृष्टीने, म्हणजेच धर्मशिक्षण देण्याच्या दृष्टीने परात्पर गुरु डॉक्टरांनी स्थानिक केबल दूरचित्रवाहिन्यांनी केलेल्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आधी मराठीतून नियमित मालिका निर्माण केल्या. पुढे राष्ट्रीय वाहिनीवर प्रतिदिन अर्ध्या घंट्याच्या दोन हिंदी मालिका देण्याची मागणी आली. तेव्हा त्यानुसारही एक वर्षभर त्याची पूर्तता करण्यात आली. पुढे तांत्रिक कारणामुळे तो प्रकल्प थांबवावा लागला.
२८ ई. संकेतस्थळांवरून विविध भाषांतून नियमितपणे ध्वनीचित्र-चकत्या (व्हिडिओज्) प्रसिद्ध करणे : आता संकेतस्थळांवरून मराठी, हिंदी, इंग्रजी, तसेच अनेक विदेशी भाषांमधूनही संशोधनात्मक आणि धर्मशिक्षण देणार्या ध्वनीचित्र-चकत्या (व्हिडिओज्) नियमितपणे प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यांना दर्शकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
२८ उ. संकेतांक देण्याची पद्धत घालून देणे : सनातन संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढत गेली, तसा विविध प्रकारचे लिखाण जमा होऊ लागले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्या सर्व लिखाणाची वर्गवारी करणे आणि प्रत्येक विषयाच्या लिखाणाला संकेतांक देण्याची पद्धत आरंभीलाच घालून दिली. केवळ संकेतांकामुळेच सध्या सनातनकडे उपलब्ध असलेल्या या लिखाणाच्या अक्षरशः महासागरातील पुढील काळात नेमके लिखाण शोधून काढणे सहज शक्य झाले. टंकलिखित लिखाणाला जसे संकेतांक देण्यात आले, तसेच पुढे छायाचित्रे, ध्वनीचित्रफीती यांनाही संकेतांक देण्यात आले.
२९. संकेतस्थळाची निर्मिती करणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अध्यात्मशास्त्र, साधना, आपत्कालीन साहाय्य आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांचा समाजाला लाभ करून देण्याची तीव्र तळमळ आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अध्यात्मप्रसार, ग्रंथ, नियतकालिके यांच्या माध्यमातून पुष्कळ प्रमाणात हे कार्य केल्यावरही जगभरात हे कार्य शीघ्र गतीने पोचवण्याच्या तळमळीमुळे त्यांच्या कृपेने ‘sanatan.org’ या संकेतस्थळाची निर्मिती झाली. त्यापाठोपाठ त्यांच्या कृपेने ‘हिंदु जनजागृती समिती’चे संकेतस्थळ निर्माण झाले. नंतर ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ आणि ‘फोरम फॉर हिंदु अवेकनिंग’ या परदेशातील धर्मादाय संघटनांच्या संयुक्त विद्यमाने अनुक्रमे ‘ssrf.org’ आणि ‘forumforhinduawakening.org’ ही संकेतस्थळे निर्माण झाली. त्यानंतर ‘Balsanskar.com’ आणि ‘spiritual.university.org’ ही संकेतस्थळे निर्माण झाली. ‘सनातन प्रभात’ची सर्व नियतकालिकेही संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्यांना प्रत्यक्ष ती उपलब्ध होत नाहीत, अशा जगभरातील सर्व जिज्ञासूंना त्यांचा लाभ घरबसल्या घेता येतो.
३०. आध्यात्मिक त्रासांवर उपाय होण्यासाठी चैतन्यमय सात्त्विक उत्पादनांची निर्मिती करणे
जीवनात व्यावहारिक सौख्य मिळवणे आणि परमार्थ उत्तम करता येणे, या दोन्हींसाठी व्यक्ती अन् समाज यांतील सकारात्मकता (सात्त्विकता) वृद्धींगत करणे अन् नकारात्मकता (रज-तम) न्यून करणे आवश्यक असते. शारीरिक आणि मानसिक स्तरांच्या तुलनेत आध्यात्मिक स्तर सर्वाधिक सूक्ष्म असल्याने या स्तरावर केलेल्या सात्त्विकतेमधील वृद्धी सर्वांत परिणामकारक ठरते. सध्या जगभरातील सुमारे ८० टक्के व्यक्तींना त्यांच्या जीवनात केव्हा ना केव्हा आध्यात्मिक त्रास होतच असतो. या त्रासावर उपाय म्हणूनही चैतन्यमय अशा उत्पादनांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात होती. यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने अत्तर, कापूर, उदबत्ती, वाती, पंचांग, अशा विविध सात्त्विक उत्पादनांची निर्मिती करण्यात आली. त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कालमहिम्यानुसार महत्त्वाच्या अशा अष्टदेवतांची सात्त्विक चित्रे आणि नामजपाच्या पट्ट्या सिद्ध (तयार) केल्या. गणपतीची सात्त्विक मूर्ती बनवली. त्यानंतर श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची निर्मिती केली. या उत्पादनांच्या सात्त्विकतेच्या आणि म्हणून परिणामकारकतेच्या मुळाशी साधकांची साधना, त्यांचा त्याग आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प आहे.
३१. आपत्काळाची पूर्वसिद्धता
अनेक संतांनी, तसेच जगभरातील द्रष्ट्यांनी आपत्काळ समीप आल्याची सूचना वेळोवेळी केली आहे. या आपत्काळात आपले रक्षण व्हावे, तसेच आपत्कालीन परिस्थितीला धिराने आणि सुयोग्य पद्धतीने सर्व स्तरांवर तोंड देता यावे, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध स्तरांवर प्रभावी उपाययोजना केली आहे. यात त्यांनी केवळ आपल्या साधकांचा नाही, तर अखिल मानवजातीचा विचार केला आहे. या अंतर्गत आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीने आपत्कालीन साहाय्य आणि प्रथमोपचार, तसेच विविध व्याधींवर आयुर्वेद, तसेच अन्य उपचारपद्धतींची माहिती असलेल्या ग्रंथांची निर्मिती, प्रभावी प्रथमोपचार करू शकणार्या व्यक्तींची शिबिरे आणि साप्ताहिक वर्ग यांच्या माध्यमातून भारतभर सिद्धता (तयारी) करवून घेणे इत्यादी गोष्टी अंतर्भूत आहेत.
(क्रमश: वाचा उद्याच्या अंकात)
– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०१७)
सनातन साधक-पुरोहित पाठशाळा
सध्या समाजात बर्याच प्रमाणात पोटार्थी पुरोहित आढळतात. त्यामुळे यजमान आणि देव यांच्या मधील दुवा बनू शकणारे, आपली साधना म्हणून याज्ञिकी करणारे सात्त्विक पुरोहित निर्माण करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ३०.४.२००८ या दिवशी सनातन साधक-पुरोहित पाठशाला चालू केली. ‘या पाठशाळेतील पुरोहित याज्ञिकी करण्याच्या माध्यमातून आध्यात्मिक उन्नती करून संतपदाला जातील’, अशा तर्हेने त्यांचा पाठ्यक्रम आहे. आज आपत्काळ जवळ येऊन ठेपल्यावर विविध संत आणि सप्तर्षि, महर्षि भृगु यांच्या माध्यमातून साधकांचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यांसाठी विविध यज्ञ करायला सांगतात. ते करण्यासाठी तसे सात्त्विक पुरोहित मिळणे कठीण असते. त्यामुळे ही पाठशाळा चालू करण्यातूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा द्रष्टेपणा दिसून येतो.
आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |