आमचे परराष्ट्र धोरण आम्ही स्वत: ठरवतो !

‘क्वॉड’मध्ये सहभागी होण्यावरून धमकी देणार्‍या चीनला बांगलादेशने सुनावले !

लहान बांगलादेश चीनला सडेतोड उत्तर देतो, हे कौतुकास्पदच होय ! भारताने बांगलादेशकडून शिकण्यासह त्याला चीनविरोधात उभे रहाण्यासाठी साहाय्यही केले पाहिजे !

ढाका (बांगलादेश) – अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या देशांच्या ‘क्वाड’ गटामध्ये सहभागी होण्यावरून धमकी देणार्‍या चीनला बांगलादेशने सुनावले आहे. ‘बांगलादेश ‘क्वॉड’मध्ये (क्वाडिलेट्रल सिक्युरिटी डायलॉग’मध्ये) सहभागी झाल्यास द्विपक्षीय संबंध वाईट होतील’, अशी धमकी चीनचे राजदूत ली जिमिंग यांच्याकडून देण्यात आली होती. त्यावर ‘बांगलादेश एक अलिप्त आणि संतुलित परराष्ट्र धोरण आखणारा देश आहे. आम्ही स्वतंत्र आणि सार्वभौम देश असून आमचे परराष्ट्र धोरण आम्ही स्वत: ठरवतो’, अशा शब्दांत बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ. ए.के. अब्दुल मोमन यांनी चीनला सुनावले. हिंद महासागर आणि प्रशांत महासागर क्षेत्रांत परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी ‘क्वाड’ गट स्थापन करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता नेड प्राइस यांनी याविषयी म्हटले की, अमेरिका आणि बांगलादेश यांचे घनिष्ठ संबंध आहेत. आम्ही चीनच्या राजदूताचे विधान लक्षात ठेवले आहे. आम्ही बांगलादेशचे परराष्ट्र धोरणाचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार यांचा मान राखतो.