कर्करोगासारख्या आजाराशी लढतांनाही अध्यात्मप्रसाराला प्राधान्य देणारे सातारा येथील धर्मप्रेमी श्री. सुधीर गोंधळेकर !

श्री. सुधीर गोंधळेकर

सातारा – येथील करंजे पेठेतील धर्मप्रेमी श्री. सुधीर गोंधळेकर हे गतवर्षीपासून कर्करोगाशी लढा देत आहेत. आधुनिक वैद्यकीय उपचारासाठी (केमोथेरपीसाठी) शेंद्रे गावाजवळील ‘ऑन्को लाईफ’ रुग्णालयात ते नियमितपणे जातात. तेथे त्यांनी आधुनिक वैद्यांना विचारून स्वत:च्या खोलीत नामजप यंत्र बसवले आहे. या यंत्रामुळे प्रभावित होऊन तेथील आधुनिक वैद्यांनी गोंधळेकर काकांना विविध अनुभूती सांगितल्या. तेव्हा असे नामजप यंत्र रुग्णालयात बसवून ध्वनिक्षेपकाद्वारे ते रुग्णालयातील सर्व रुग्णांना ऐकवल्यास त्यांना आध्यात्मिक स्तरावर त्याचा लाभ होईल, असे गोंधळेकर काकांनी संबंधित आधुनिक वैद्यांना सांगितले. गोंधळेकर काकांच्या या अध्यात्मप्रसाराच्या तळमळीमुळे रुग्णालय प्रशासनाने नामजप यंत्र रुग्णालयात बसवून त्याचा लाभ सर्व रुग्णांना कसा मिळेल, असे प्रयत्न चालू केले असल्याचे समजते.

गोंधळेकर काकांच्या खोलीत आल्यावर त्यांच्यावर उपचार करणारे आधुनिक वैद्य, परिचारीका आणि सफाई कर्मचारी यांनी तुमच्या खोलीत चांगले वाटते, शांत वाटते, खोलीत भरपूर सकारात्मकता जाणवते, असे सांगितले. तसेच रुग्णालयातील इतर खोल्यांमध्ये रुग्णांवर उपचार करतांना दु:ख, वेदना, भीती, नकारात्मकता आदी मोठ्या प्रमाणात जाणवते, असेही सांगितले. आधुनिक वैद्यांनी गोंधळेकर काकांना सांगितले की, कर्करोगाने ग्रस्त असूनही तुमच्याकडे पाहिल्यावर तुम्ही रुग्णाईत आहात असे वाटत नाही. त्यामुळे रुग्णालयातील इतर रुग्णांना तुम्ही सकारात्मकता कशी ठेवता, हे समजून सांगा. काही वेळेला रुग्णालयातील परिचारिका मन:शांतीसाठी गोंधळेकर काकांच्या खोलीत येऊन बसतात. त्या स्वत: गोंधळेकर काकांना त्यांच्या अनुभूतीही सांगतात.