हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन बलोपासना सप्ताहा’ची सांगता
पुणे – प्रभु श्रीरामाने पित्याची आज्ञा मानून वनवास स्वीकारला. भरताने प्रभु श्रीरामाच्या पादुका ठेवून राज्यकारभार केला. ‘स्त्री’च्या रक्षणासाठी काय करावे ? हे आपल्याला रामायणातून शिकायला मिळते. तसेच आदर्श राज्य कसे असावे ? हे आपल्याला रामराज्यातूनच शिकायला मिळते. येणार्या काळातही आपल्याला रामराज्यासाठी, म्हणजेच हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करायचे आहेत. श्रीरामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत झालेल्या बलोपासना सप्ताहातून सर्वांना रामराज्याची प्रेरणा मिळाली आहे. येथून पुढे प्रतिदिन अशीच बलोपासना करून अंतर्बाह्य रामराज्य स्थापन करूया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन बलोपासना सप्ताहा’च्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर भारत येथून ६३० हून अधिक धर्मप्रेमी जोडले होते.
युवक-युवतींमध्ये राष्ट्राभिमान जागृत व्हावा, तसेच श्रीराम आणि हनुमान यांची भक्ती करून स्वतःत भक्तीभाव निर्माण व्हावा, या उद्देशाने ‘ऑनलाईन बलोपासना सप्ताह’ हा उपक्रम राज्यांमध्ये ठिकठिकाणी आयोजित करण्यात आला. या उपक्रमाची सांगता हनुमान जयंतीच्या दिवशी झाली. या कार्यक्रमात सर्व उपस्थित धर्मप्रेमींनी ‘बलोपासना सप्ताह चालूच ठेवावा’, अशी मागणी केली. त्यानंतर ठिकठिकाणी १४ दिवसांचे बलोपासनावर्ग चालू झाले. त्याला धर्मप्रेमींचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगता कार्यक्रमात समितीचे श्री. अभिजित कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचा उद्देश, तर युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी हनुमंताची दास्यभक्ती आणि हनुमंताचे शौर्य, त्याचे पराक्रम यांचे क्षात्रभावपूर्ण वर्णन केले. कार्यक्रमाच्या शेवटी धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सप्ताहातून झालेल्या लाभाविषयी विविध अनुभव सांगितले.
धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत
अंकिता राऊळ, सिंधुदुर्ग – सुमित सागवेकर यांच्या मार्गदर्शनातून रामराज्याप्रमाणेच आदर्श हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा मिळाली. ‘वीर मारुतीरायांप्रमाणे आमच्यातही दास्यभक्ती निर्माण होऊ दे’, अशी प्रभु श्रीरामचंद्रांच्या चरणी प्रार्थना !
सुयोग राऊळ, सिंधुदुर्ग – पुष्कळ सुंदर मार्गदर्शन मिळाले. जसे शरिराला व्यायामाची आवश्यकता आहे, तसे मनाला सद्विचार आणि नामस्मरण यांची आवश्यकता असते, हे अनुभवायला मिळाले.
कु. तृप्ती राऊत, मुंबई – हनुमंताची दास्यभक्ती शिकायला मिळाली. हनुमंताचे गुण माझ्यातही आणण्याचा प्रयत्न करीन.
कु. धनश्री शंकर दिवटे, मुंबई – श्रीराम आणि लक्ष्मण यांमध्ये पिता-पुत्रासारखे नाते होते, हे शिकायला मिळाले. आजच्या व्याख्यानामधून देवावरील श्रद्धा दृढ झाली.
कु. संपदा शिरगावकर, मुंबई – हिंदूंना जागृत करण्याची आवश्यकता असून हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक आहे, हे लक्षात आले. मीही मला जमेल तसे धर्मजागृतीचे कार्य करण्याचा आणि धर्मांतर रोखण्याचा प्रयत्न करीन.
अनिरुद्ध कोरे, कोल्हापूर – वर्गामुळे क्षमता वाढण्यास साहाय्य झाले. प्रतिदिन सकाळी उठण्याची सवय लागली. दिवसभर नामजप केल्यामुळे मन प्रसन्न रहात आहे.
प्रतिभा दुंडगे, कोल्हापूर – वर्गातून प्रभु श्रीरामचंद्र आणि हनुमंतरायाचा सामूहिक नामजप करता आला. त्यातून ईश्वर आपल्याला प्रतिदिन स्वरक्षण प्रशिक्षणाचे नवीन प्रकार शिकायला बळ देत आहे, अशी अनुभूती वेळोवेळी येत होती. वर्गामध्ये सांगितल्या जाणार्या प्रसंगांतून प्रेरणा मिळाली. प्रसंग ऐकतांना ‘दृश्य डोळ्यांसमोर पहात आहे’, असे जाणवत होते. हे सर्व केवळ प्रभु श्रीराम आणि हनुमानरायाच्या, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादामुळे शक्य झाले. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते.
आसावरी एरंडे, कोल्हापूर – बलोपासना वर्गामुळे क्षमता वाढल्याचे जाणवत आहे. शौर्य आणि भक्तीही वाढायला साहाय्य झाले.