सीकर (राजस्थान) येथे कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह पुरतांना नियमांचे उल्लंघन

अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्यांपैकी २१ जणांचा काही दिवसांत मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

सीकर (राजस्थान) – सीकर जिल्ह्यातील खीरवा गावामधील एका कोरोनाबाधित रुग्णाचा गुजरातमधील सूरतमध्ये मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गावामध्ये आणून पुरण्यात आला. यानंतर काही दिवसांत २१ लोकांचा मृत्यू झाला. हे सर्व जण कोरोनाबाधिताच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. या वेळी त्यांनी मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीतून काढला होता. त्यांनी मृदेहाला हात लावला होता. यामुळे त्यांनाही कोरोनाची बाधा होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा तर्क येथील लोकांकडून केला जात आहे. अंत्यसंस्कार करतांना कोरोनाच्या संदर्भातील नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचेही म्हटले जात आहे; मात्र प्रशासनाने याला दुजोरा दिलेला नाही.

सीकरचे जिल्हाधिकारी अविचल चतुर्वेदी यांनी सांगितले की, अधिकार्‍यांनी गावाचा दौरा करून त्यांना अंत्यसंस्कारांविषयीच्या नियमांची माहिती देऊन त्याचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच प्रत्येक घराची माहिती गोळा करण्यात येत आहे. गावामध्ये सॅनिटायझेशनही करण्यात येत आहे.