पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना जामीन देण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना जामीन मिळतो, तर कोरोनाबाधित आसारामजी बापू यांना का नाही ?

मुंबई – पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना कारागृहात कोरोनाचा संसर्ग होऊन त्यांना वेळीच उपचार न मिळाल्याने जोधपूर येथील म. गांधी रुग्णालयात हालवण्यात आले आहे. यातून राजस्थान सरकारचा गलथानपणाच दिसून येतो. ८० वर्ष वय असलेले आणि अनेक आजारांशी लढत असलेले बापूजी यांची कोरोनाच्या दृष्टीने काळजी घेणे, हे सरकारचे कर्तव्यच आहे. सरकारी यंत्रणा त्यांची पुरेशी काळजी घेईल, अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे त्यांना योग्य आणि तातडीने उपचार मिळावेत, तसेच त्यांना तातडीने जामीन संमत करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे.

श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,

श्री. रमेश शिंदे

१. महाराष्ट्रात अनेक कारागृहांत कोरोनाचा संसर्ग पसरल्याने शासनाने अनेक बंदीवानांना जामीन संमत करून मुक्त केले आहे. शहरी नक्षलवादी वरवरा राव यांच्यावर तर पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप असतांनाही त्यांचे वय आणि आजारपण पहाता त्यांना जामीन मिळाला; मग आसारामजी बापू यांना कोरोना झाला आहे, तरी त्यांना जामीन का मिळू नये ? असा प्रश्‍न निर्माण होतो.

२. पूज्यपाद संतश्री बापूजींना कोरोना झाल्यावर त्वरित रुग्णालयात न हालवता ४ दिवसांनी अत्यवस्थ झाल्यावर रुग्णालयात हालवले गेले. यातूनच सरकार हिंदु समाज आणि हिंदु संत यांच्याविषयी संवेदनहीन आहे, हेच दिसून येते.

३. हिंदु जनजागृती समिती पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी ईश्‍वरचरणी प्रार्थना करते. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना शीघ्रातीशीघ्र चांगल्या रुग्णालयात उपचार मिळावेत आणि त्यांना जामीन संमत करावा, अशी समिती मागणी करत आहे.