आपत्काळाची भीषणता जाणून साधकांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी सोयीसुविधा करणारे साधकवत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले !
भविष्यवेत्ते केवळ भविष्य वर्तवतात, तर गुरु कृपावत्सल असतात. त्यामुळेच द्रष्टे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपत्काळाची चाहूल ओळखून केवळ साधकांना सूचित केले नाही, तर साधकांना पुढील काळात सुविधाजनक व्हावे, यासाठी प्रत्यक्ष उपाययोजनाही आरंभल्या. सनातनच्या आश्रमांच्या उभारणीच्या वेळीच परात्पर गुरु डॉक्टरांनी विहिरीतून पाणी उपसण्यासाठी सोय करणे, डोंगरावरून वहात येणारे पाणी शुद्ध होण्यासाठी नदीतील दगड-गोटे जमिनीत बसवणे, यांसारख्या निसर्गानुकूल उपाययोजना योजल्या आहेत, यातून त्यांचे द्रष्टेपण दिसून येते ! काटकसर, तडजोड करणे आदी गुण साधकांमध्ये रुजवून त्यांनी शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर साधकांची प्रतिकूलतेला सामोरे जाण्याची सिद्धता करवून घेतली आहे !
तिसर्या महायुद्धात फार मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होणार आहे !
‘वर्ष २००४ मध्ये एकदा परात्पर गुरु डॉक्टरांशी साधनेविषयी बोलत असतांना अकस्मात् ते आम्हाला म्हणाले, ‘‘वर्ष २०१८ नंतर तिसरे महायुद्ध चालू होईल. त्या वेळी जगभरात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होईल. अनेक इमारती आणि पूल यांचे केवळ ढिगारे रहातील. दुसर्या महायुद्धाच्या काळात प्रेते एकमेकांवर टाकून त्यांचे एकत्र दहन करण्यात आले होते. आता होणार्या तिसर्या महायुद्धामध्ये होणारी जीवित आणि वित्त यांची हानी आतापर्यंत झालेल्या दोन्ही महायुद्धांपेक्षाही अधिक असेल. या वेळी अनेक गावे, महामार्ग, शहरे यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेते पडलेली असतील की, ती उचलण्यासाठी माणसेही मिळणार नाहीत आणि ‘त्यांची गणतीही करता येणार नाही’, अशी स्थिती असेल.
आपत्काळात आश्रमात राहून साधना करणार्यांची प्रगती होईल !
आपत्काळाविषयी बोलतांना परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘येणारा आपत्काळ फार कठीण काळ असणार आहे. सर्वत्रच्या साधकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागेल. त्या वेळी देव साधकांना ‘स्थलांतरित कुठे व्हायचे’, हे सुचवेल. या आपत्काळात आश्रमात रहाणार्या साधकांची पुष्कळ साधना होणार आहे. त्या काळात आश्रमाच्या एखाद्या कोपर्यात राहून साधना केली आणि पुढे जिवंत राहिलो, तर त्या साधकाची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक होईल.’’
साधकांची व्यवस्था आश्रमातच करावी लागणार असणे !
वर्ष २००४ मध्ये आम्ही सर्व साधक कार्यालयीन भागासह सुखसागर येथून रामनाथी आश्रमात स्थलांतरित झालो. त्या वेळी रामनाथी आश्रमाचे बांधकाम पूर्ण झालेे नव्हते; म्हणून ४ – ५ मासांसाठी पुरुष साधकांची रहाण्याची व्यवस्था एका मोठ्या खोलीत एकत्रित केली होती आणि झोपण्याची व्यवस्था काही सेवांच्या ठिकाणी केली होती. त्याचप्रमाणे काही साधिकांच्या झोपण्याची व्यवस्थाही अन्य सेवांच्या कक्षात केली होती. परात्पर गुरु डॉक्टर रामनाथी आश्रमात आल्यानंतर त्यांनी ‘साधकांची रहाण्याची सर्व व्यवस्था कशी केली आहे ?’ हे पाहिले. ते पाहून परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘पुढे आपत्काळ आल्यावर या जागेत आतापेक्षा अधिक साधक आणि साधिका यांना झोपावे लागेल; कारण अनेक साधकांचा आश्रम हाच आधार आणि निवास असणार आहे. त्यांची खाणे-पिणे आणि रहाणे यांसह सर्व व्यवस्था येथेच करावी लागेल.’’
आपत्काळात सौरयंत्रणा बसवावी लागेल !
रामनाथी आश्रमात स्थलांतरित झाल्यावर प.पू. डॉक्टरांनी पाणी गरम मिळण्यासाठी आश्रमाच्या छतावर ‘सोलर पॅनल’ बसवण्याच्या यंत्रणेची माहिती घेण्यास सांगितले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘पुढील आपत्काळात सूर्यप्रकाशाचा (सौरशक्तीचा) वापर करून गरम पाणी मिळवता येईल. त्यामुळे आपत्काळात ज्या साधकांना गार पाण्याची सवय नाही किंवा ज्यांना गार पाणी चालत नाही, त्यांना ‘सोलर’चे गरम पाणी मिळेल. वेळप्रसंगी पुढे गॅस उपलब्ध झाला नाही, तर आपल्याला ‘सौरशक्तीचा (सोलरचा) वापर करून डाळ-भात शिजवता येईल का ?’, तेही पहावे लागेल आणि त्याचसमवेत आश्रमातील विजेवर चालणारी उपकरणे सौरशक्तीवर कशी चालतील ?’, यासाठीही प्रयत्न करावा लागेल. आपल्याला ‘बायोगॅस’चीही सिद्धता करावी लागेल. त्यामुळे आपत्काळात आश्रमात रहाणार्या साधकांना न्यूनतम अडचणींचा सामना करावा लागेल.’’
‘डोंगरावरून वहात येणारे पाणी साधकांना पिण्यायोग्य व्हावे’, यासाठी नदीतील दगड-गोटे आश्रमाजवळच्या भूमीत बसवून घेणे !
आश्रमाचे बांधकाम चालू असतांनाच परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘पावसाळ्यात वा अन्य वेळीही डोंगरावरून वहात येणारे पाणी भूमीतून आश्रमातील विहिरीत येते. ते पाणी साधकांना पिण्यायोग्य होण्यासाठी आश्रमाच्या इमारतीजवळच्या परिसरातील भूमीत नदीतील वेगळ्या प्रकारचे दगड-गोटे अशा प्रकारेे बसवा की, त्यामुळे त्यावरून वहात येणार्या पाण्याचे शुद्धीकरण होईल. पुढे नगरपालिकेच्या पाण्याचा पुरवठा बंद पडला, तर या दगड-गोट्यांवरून वहात आल्यामुळे विहिरीतील पाणी पिण्यायोग्य असेेल. आपत्काळात वीज नसेल, तेव्हा विहिरीतील पाणी हाताने उपसून पिण्यासाठी वापरता येईल.’’
– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘आपत्काळात औषधे उपलब्ध होणे कठीण आहे’, हे आधीच ओळखून वैद्य साधकांना विविध उपचारपद्धती शिकून घेण्यासाठी प्रेरणा देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
१. ‘माझे आयुर्वेद या विषयातील शिक्षण झालेले आहे. मी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आल्यानंतर परात्पर गुरुदेवांनी मला विविध चिकित्सा पद्धतींचा अभ्यास करायला शिकवले. त्यामध्ये बिंदूदाबन, रंगचिकित्सा, चक्र हिलिंग, मॅन्युअल लिम्फाटिक ड्रेनेज (Manual Lymphatic Drainage), मर्म चिकित्सा, नस चिकित्सा (Neurotheraphy), अग्नीकर्म विद्धकर्म इत्यादी पद्धतींचा समावेश आहे. याशिवाय ते मला आयुर्वेदाच्या अंतर्गत असलेले पंचकर्म आणि मर्दन यांच्या विविध पद्धती शिकण्यासाठी सतत प्रेरणा देत असत. ते म्हणायचे की, येणार्या काळात औषधे आणि वैद्य नसतील. बाह्य उपचारपद्धती शिकून घ्या. सध्या औषधे उपलब्ध होत नाहीत त्यामुळे आताच त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी सांगितलेल्या गोष्टींची प्रचीती येत आहे.
२. परात्पर गुरु डॉक्टरांनी ३ वर्षांपूर्वी ‘पल्सऑक्सिमीटर’ हे यंत्र पाहिल्यावर सांगितले होते, ‘‘हे यंत्र आपला प्रत्येक आश्रम आणि सेवाकेंद्र येथे उपलब्ध करून ठेवावे.’’ तेव्हा हे यंत्र सामान्य व्यक्तीकडे तर नाहीच; पण रुग्णालयांमध्येही केवळ ‘आयसीयू’मध्ये (अतीदक्षता विभागात) वापरले जायचे. त्यामुळे त्यांनी असे सांगितल्यावर आम्हाला आश्चर्य वाटले होते; पण आज या यंत्राची आवश्यकता घराघरांमध्ये भासत आहे.
३. ‘पुढे स्नायू आणि अस्थी यांसंदर्भातील आजारांचे प्रमाण वाढणार आहे’, असे सांगून परात्पर गुरुदेवांनी मर्दनाचे अनेक प्रकार शिकून घेण्यास सांगितले. त्यानंतर तशाच प्रकारच्या व्याधी अनेक साधकांना झाल्याचे लक्षात आले.’
– वैद्या कु. अपर्णा महांगडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
गरमी असतांनाही आपत्काळासाठी पंखा न लावण्याची सवय करणारे परात्पर गुरु डॉक्टर !
‘प.पू. डॉक्टरांच्या खोलीचा केर काढण्यापूर्वी मी नेहमी पंख्याचे बटण बंद करते. तेव्हा एकदा पुढील संभाषण झाले.
परात्पर गुरु डॉक्टर : केर काढून झाला की, पटकन पंखा लावूया. पुष्कळ गरम होत आहे.
मी : मी उद्यापासून लवकर केर काढते.
परात्पर गुरु डॉक्टर : नको. तेवढी गरज नाही. आता आपत्काळ जवळ आला आहे ना ! आपत्काळात आपल्याला पंखा मिळणार नाही; म्हणून आतापासूनच सवय करतो.’
– सौ. रोहिणी भुकन, सनातन आश्रम, गोवा.
आपत्काळातील स्थितीविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी काढलेले उद्गार !
१. ‘एकदा दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चीनशी संबंधित एक वृत्त पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘येत्या काही वर्षांनी तुमच्या पिढीला तिसरे महायुद्ध पहावे लागेल. चीन पहिले युद्ध पुकारील आणि मग तिसरे महायुद्ध चालू होईल.’’
२. आम्ही नागपूर येथील घराची विक्री केली. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘घराच्या विक्रीतून आलेले पैसे साठवून ठेवा. पुढे आपत्काळ येईल. तेव्हा साधकांसाठी प्रतिदिन पाव खरेदी करायला देखील भरपूर पैसे लागतील.’’
३. वर्ष १९९८ मध्ये एका साधकाने ‘बेकरी’चा कोर्स केला असल्याचे परात्पर गुरु डॉक्टरांना कळले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘पुढे आपत्काळ येणार आहे. तेव्हा तुझ्या ‘बेकरी’तून साधकांना ब्रेड मिळतील.’’
४. सांगली येथील एक साधक कुटुंबासह आश्रमात रहाण्यासाठी आल्यानंतर त्यांचे घर रिकामे होते. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘पुढे आपत्काळ चालू झाल्यानंतर मुंबईतील सर्व साधक मुंबई सोडून कोकण-गोवा येथे येतील. त्या वेळी सगळ्यांची व्यवस्था येथे करता आली नाही, तर सांगली येथे करता येईल.’’
– श्री. चेतन राजहंस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.