मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने २ प्रकरणांत प्राथमिक अन्वेषणाचा आदेश दिला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीचा हा परिणाम असल्याचा आरोप करत याविषयी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अन्वेषण करण्यात यावे, अशी याचिका मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.
२९ एप्रिल या दिवशी न्यायमूर्ती एस्.एस्. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपिठापुढे ही याचिका सादर करण्यात आली. यावर न्यायालयाने राज्यशासनाचे म्हणणे मागवले असून पुढील सुनावणी ४ मे या दिवशी ठेवण्यात आली आहे. परमबीर सिंह यांनी या याचिकेत म्हटले आहे की, १९ एप्रिल या दिवशी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या भेटीत त्यांनी ‘अनिल देशमुख यांच्या विरोधातील पत्र मागे घ्या, जेणेकरून त्यांच्या विरोधातील खटल्याला महत्त्व उरणार नाही. तुम्ही संपूर्ण व्यवस्थेशी लढू शकणार नाही. उलट आता तुमच्या विरोधात एकापाठोपाठ एक खटले प्रविष्ट होतील’, अशी धमकी दिली होती. ही गोष्ट खरीही ठरली; कारण अकोला जिल्ह्यात २८ एप्रिल या दिवशी माझ्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचे म्हटले आहे. पोलीस आयुक्त असतांना विभागातील अडचणी प्रसिद्धमाध्यमांमध्ये प्रसारित केल्यामुळे ऑल इंडिया सर्व्हिसच्या नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाविषयी गृहविभागाने परमबीर सिंह यांच्या प्राथमिक अन्वेषणाचा आदेश देण्यात आला आहे. परमबीर सिंह सध्या गृहरक्षक दलाच्या पोलीस महासंचालक पदावर कार्यरत आहेत.