१. ‘अभ्यासवर्गात सर्व जिज्ञासू केवळ आले आणि विषय ऐकून निघून गेले’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कधीच होऊ दिले नाही. ‘सर्व जिज्ञासूंना कसे सहभागी करून घेता येईल’, याकडे त्यांचे लक्ष असायचे.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले पुर्वी घेत असलेल्या अभ्यासवर्गात अध्यात्मशास्त्राच्या तात्त्विक आणि प्रायोगिक भागांचा अनोखा संगम असणे
परात्पर गुरु डॉक्टर अभ्यासवर्गात अध्यात्माची मूळ संकल्पना पुनःपुन्हा जिज्ञासूंना सांगायचेे, उदा. अध्यात्म हा बुद्धीने समजणारा विषय नाही. ते प्रत्यक्ष कृती केल्यावरच समजते. अध्यात्मात भावनेला काहीच महत्त्व नाही. जीवनातील महत्त्वपूर्ण घटना, उदा. जन्म, विवाह आणि मृत्यू सर्व प्रारब्धानुसारच होत असतात.
ते अभ्यासवर्गात स्पंदनशास्त्राचा प्रायोगिक भागही नियमितपणे घ्यायचे. त्यात ‘सूक्ष्मातील प्रयोग’ हे सूत्र नियमितपणे घेतले जात होते. कुणी चांगली कृती केल्यास परात्पर गुरु डॉक्टर त्वरित त्यांची स्तुती करायचे. अशा प्रकारे तात्त्विक आणि प्रायोगिक भागांचा अनोखा संगम मी अन्य कोणत्याही प्रवचनात कधीच पाहिला नाही.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले ‘जिज्ञासू व्यक्तीला अभ्यासवर्गाचा आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक लाभ व्हावा’, यासाठी प्रयत्नशील असणे
परात्पर गुरु डॉ. आठवले प्रवचनांची मालिका घ्यायचे. ते नेहमीच जिज्ञासू व्यक्तीला पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. एखादी जिज्ञासू व्यक्ती दोन किंवा तीन वर्गांना सलग आली असल्यास ते त्या व्यक्तीला त्वरित सत्संग किंवा सत्सेवा यांविषयी सांगायचे. ‘जिज्ञासूने अभ्यासवर्गात सांगितलेले केवळ श्रवण करायचे’, असे नसून ‘त्याला अभ्यासवर्गाचा आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक लाभ व्हावा’, असेच परात्पर गुरुदेवांचे प्रयत्न असायचे. ‘प.पू. भक्तराज महाराज मुंबर्ईत आल्यावर परात्पर गुरुदेव सर्व साधकांना त्यांचे दर्शन व्हावे’, यासाठी प्रयत्नशील असायचे. परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्यासारख्या सामान्य जिवांना अनुभवायला दिलेले हे क्षण अत्यंत महत्त्वपूर्ण, परिणामकारक आणि अविस्मरणीय होते.
४. परात्पर गुरु डॉक्टरांच्या तीव्र तळमळीमुळे जिज्ञासूंचा खर्या अर्थाने आध्यात्मिक प्रवास चालू होणे
अध्यात्मातील ‘सात्त्विकता, भाव, स्पंदने’ आदी परिभाषा मला समजत नव्हती; परंतु ‘परात्पर गुरु डॉक्टरांची तळमळ, त्यांनी दिलेले प्रेम, आमचा उद्धार होण्यासाठी ते घेत असलेले कष्ट’, अशा त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे जिज्ञासूंवर त्याचा संस्कार होऊ लागला आणि आमचा खर्या अर्थाने आध्यात्मिक प्रवास चालू झाला.
५. ‘अनेक जिज्ञासूंची आध्यात्मिक उन्नती होणे’, ही परात्पर गुरु डॉक्टरांनी घेतलेल्या परिपूर्ण अभ्यासवर्गाची महत्त्वपूर्ण फलनिष्पत्ती आहे.
६. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘परात्पर गुरुदेव, मला अशा आपल्या अलौकिक अभ्यासवर्गात सहभागी होता आले’, याविषयी मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे. ‘आपण दाखवलेल्या मार्गावरून मला वाटचाल करता येऊ दे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. सुधीश पुथलत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |