२६ रुग्णांचा मृत्यू, तर १ सहस्र १६० नवीन प्रकरणे
पणजी, २० एप्रिल (वार्ता.) – राज्यात आलेल्या कोरोनाची दुसरी लाट दिवसागणिक गडद होत चालली आहे. कोरोनाबाधित नवीन रुग्ण आणि कोरोनामुळे मृतांची संख्या प्रतिदिन नवीन उच्चांक स्थापन करत आहे. राज्यात २० एप्रिलला कोरोनाबाधित १ सहस्र १६० नवीन रुग्ण आढळले, तर कोरोनामुळेे २६ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत झालेल्यांची एकूण संख्या ९२६ झाली आहे. दिवसभरातील मृतांपैकी ३ रुग्णांचा मृत्यू रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात भरती केल्यानंतर २४ घंट्यांच्या आत झाला आहे.
राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या
८ सहस्र २४१ झाली आहे. २० एप्रिलला चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३२.२५ टक्के होतेे. दिवसभरात ४४० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण पुढील केंद्रांमध्ये अधिक आहेत. मडगाव ९५०, पर्वरी ७०५, कांदोळी ६४६, पणजी ५४६, फोंडा ५१६, वास्को ५०७, म्हापसा ५०१, कुठ्ठाळी ४५८, सांखळी २७४, कासावली २६१, चिंबल २६१, शिवोली २४५ आणि पेडणे २१३.
|
पणजी, २० एप्रिल (वार्ता.) – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २० एप्रिल या दिवशी देहली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी झालेल्या प्रयत्नांवर चर्चा केली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २१ एप्रिलला सकाळी १०.३० वाजता एक उच्चस्तरीय बैठक बोलावली असून यामध्ये कृतीआराखडा निश्चित करून तो घोषित केला जाण्याची शक्यता आहे.