मुंबई – राज्यात कोरोनाविषयीचे निर्बंध कडक करूनही नागरिक किराणा माल, भाज्या आणि अन्य साहित्य यांच्या खरेदीच्या नावाखाली रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे बाहेर गर्दी होत आहे. त्यामुळे आता किराणा मालाची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच उघडी ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. १९ एप्रिल या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात अन्य मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यामध्ये फळविक्रेते, डेअरी, सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांची दुकाने, मांस-मासे विक्रेते, शेती उत्पादनांशी संबंधित दुकाने, प्राण्यांचे अन्नपदार्थ विकणारी दुकाने, पावसाळी साहित्य आदी दुकानांचाही समावेश करण्यात आला आहे. या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत घरपोच सेवा देण्याची अनुमती देण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक प्रशासनाला परिस्थितीनुरूप पालट करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.