पुण्‍यात कोरोनाचे खोटे चाचणी अहवाल देणार्‍या दोघांवर पोलिसांची कारवाई !

आपत्‍काळातही आर्थिक लाभासाठी जनतेच्‍या जिवाशी खेळणार्‍यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित !

कोरोनाच्‍या चाचणीचे बनावट अहवाल देणार्‍या आरोपींसह पोलीस

पुणे – कोरोनाच्‍या चाचणीचे बनावट अहवाल देणार्‍या दोघांना पुणे येथील डेक्‍कन जिमखाना पोलिसांनी अटक केली आहे. सागर हांडे (वय २५ वर्षे) आणि दयानंद खराटे (वय २१ वर्षे) अशी या दोघांची नावे आहेत. जंगली महाराज रस्‍त्‍यावरील एका प्रयोगशाळेच्‍या नावाने बनावट चाचणी अहवाल सिद्ध करून त्‍याची विक्री होत होती. ही माहिती मिळाल्‍याने वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी ही कारवाई करत दोघांना कह्यात घेतले. ज्‍या नागरिकांना तातडीने अहवाल पाहिजे अशांकडून पैसे घेऊन त्‍यांना बनावट अहवाल भ्रमणभाषवर पाठवण्‍यात येत होते.

सौजन्य : लोकमत