गोव्यात प्रवेश करणार्‍यांसाठी कोरोनाविषयक चाचणी बंधनकारक करा ! – महिला काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  

पणजी – गोव्यात प्रवेश करणार्‍या प्रत्येकाची कोरोनाशी संबंधित  ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी करणे बंधनकारक करावे, अशी मागणी गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक आणि त्यांच्या सहकारी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्याकडे केली आहे.

हरिद्वार येथील महाकुंभ मेळ्याला जाऊन येणार्‍यांना १५ दिवस अलगीकरण बंधनकारक करा !

हरिद्वार येथे महाकुंभ मेळ्यामध्ये १ सहस्र २०० लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. या मेळ्याला जाऊन गोव्यात परतत असलेल्यांना १५ दिवस घरी अलगीकरण बंधनकारक करावे, अशी मागणी महिला काँग्रेसने पुढे केली आहे.

सार्वजनिक कार्यक्रमांच्या उपस्थितीवर जिल्हाधिकारी निर्बंध घालणार

पणजी – राज्यात लग्न समारंभाला मोजक्याच लोकांनी उपस्थित रहाणे, अन्य सार्वजनिक कार्यक्रमांच्या उपस्थितीवर निर्बंध घालणे आदींविषयी जिल्हाधिकारी लवकरच निर्णय घोषित करणार आहे. त्याचप्रमाणे दंडाच्या रकमेत वाढ करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. कोरोनाबाधित झालेले आणि नंतर कोरोनापासून बरे झालेले अशांनी ‘प्लाझ्मा दान’ करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. राज्यात टिका उत्सव ही कोरोना लसीकरण मोहीम २० एप्रिलपर्यंत चालणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.