म्हापसा, १६ एप्रिल (वार्ता.) – राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुढील २ दिवसांत कठोर नियम करण्यात येणार आहेत; मात्र राज्यात संपूर्ण दळणवळण बंदी लागू केली जाणार नाही, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
सदानंद शेट तानावडे पुढे म्हणाले, ‘‘राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे धोकादायक आहे. पक्षाच्या पदाधिकार्यांनी ‘राज्यात निर्बंध लादणे आवश्यक आहे’, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे व्यक्त केले आहे. राज्यात संपूर्ण दळणवळण बंदी लागू करणे हा यावरील उपाय नव्हे, तर लग्नसमारंभ आदी सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लागू करणे अत्यावश्यक आहे. परराज्यांतून गोव्यात येणार्यांची कोरोनाविषयक चाचणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. यासंबंधी गोवा शासन पुढील २ दिवसांत योग्य निर्णय घेणार आहे.’’
नगरपालिकांची निवडणूक पुढे ढकलणार नाही
राज्यात पुढील आठवड्यात ५ नगरपालिकांची निवडणूक होणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्याची आवश्यकता नाही. कोरोनाचा संसर्ग संपूर्ण देशात वाढला आहे. तसेच निवडणूक देशभर होत आहे, असे सदानंद शेट तानावडे पुढे म्हणाले.