पुणे येथील ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या वतीने एक दिवसीय काम बंद आंदोलन !

कोरोनाच्या आपत्काळात अशा प्रकारे वैद्यकीय अधिकार्‍यांनी आंदोलन करणे अतीगंभीर आहे !

ससून रुग्णालयात एक दिवस काम बंद आंदोलन

पुणे – राज्यभरातील वैद्यकीय अधिकार्‍यांना सेवेत कायम करावे, तसेच सर्वांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळावे या मागण्यांसाठी १५ एप्रिल या दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय वैद्यकीय अधिकारी संघटना यांनी एक दिवस काम बंद आंदोलन केले. ससून रुग्णालयात २४, तर राज्यामध्ये ३५० वैद्यकीय अधिकारी आहेत. वैद्यकीय अधिकारी आधुनिक वैद्य गजानन भारती, आधुनिक वैद्या स्वप्ना यादव, आधुनिक वैद्य प्रशांत दरेकर यांच्यासह २४ जणांनी आंदोलनात सहभाग घेतला. या वेळी वैद्यकीय अधिकारी आधुनिक वैद्य गजानन भारती यांनी सांगितले की, सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांना सहाव्या वेतन आयोगानुसार पगार मिळतो. आम्ही राजपत्रित वैद्यकीय अधिकारी असूनही सातव्या आयोगानुसार वेतन दिले जात नाही. शासनाचा ३१ डिसेंबर २०२० चा एकत्रित मानधनाचा अध्यादेश रहित करून सर्वांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळावे यासाठी हे आंदोलन केले आहे.