मुंबई – रेल्वेच्या डब्यांचा वापर गेल्या वर्षी अनेक राज्यांनी विलगीकरणाच्या दृष्टीने केला; मात्र महाराष्ट्रात तसा वापर करण्यात आला नव्हता. कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत या डब्यांचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने कामाला प्रारंभ केला आहे. पश्चिम रेल्वेच्या कोच केअर सेंटरचे वरिष्ठ अभियंता नवनाथ कदम यांनी सांगितले की, गेल्या वर्षीचे रेल्वेचे डबे स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करून देणार आहोत. सध्या पश्चिम रेल्वेकडे एकूण ३८६ पैकी १२८ आणि मध्य रेल्वेकडे २५ डबे मुंबई विभागात आहेत. याद्वारे अनुमाने कोरोनाच्या ३ सहस्रांहून अधिक रुग्णांची सोय होणार आहे. या डब्यांमध्ये मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर, सुका आणि ओला कचरा टाकण्यासाठी कचरा पेट्या, पंखे यांची व्यवस्था केली आहे. प्रत्येक डब्यात २० रुग्ण राहू शकतात.