कोरोनाविषयक नियमांची कार्यवाही करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !
पणजी, १३ एप्रिल (वार्ता.) – गोव्यात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा अगदी नजिक आल्या असतांना हणजूण आणि वागातोर या समुद्रकिनार्यांवर कर्णकर्कश आवाजात होणार्या रेव्ह पार्ट्या बंद होण्याची चिन्हे दिसत नाहीत. रोज वेगवेगळ्या ठिकाणी या रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जात असून फ्लेक्स, बॅनर्स आणि विज्ञापने यांच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित केले जात आहे. इथे कुठेही कोरोना संसर्गाची भीती किंवा उपजिल्हाधिकार्यांनी दिलेल्या कारणे दाखवा नोटिसीची भीती दिसून येत नाही. एक महिन्यापूर्वी बार्देशच्या उपजिल्हाधिकार्यांनी कर्णकर्कश संगीतातील रेव्ह पार्ट्यांविषयी स्थानिकांकडून आलेल्या तक्रारींची नोंद घेऊन हणजूण, वागातोर, आसगाव येथील समुद्रकिनारी भागातील शॅक, पब, रेस्टॉरंट अॅन्ड बार, अशा एकूण १९ आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
या नोटिसींना केराची टोपली दाखवून, तसेच कोरोना महामारीच्या दुसर्या टप्प्यात रुग्णांची संख्या वाढत असतांना यापासून दक्षता बाळगण्याऐवजी सर्व नियम धाब्यावर बसवून रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. (प्रशासनाच्या नोटिसींना दाद न देणार्या आस्थापनांच्या पाठीशी कोण आहे ? – संपादक) या रेव्ह पार्ट्यांचा त्रास पहाटेच्या वेळी चालण्याचा व्यायाम करण्यासाठी येणार्या स्थानिक लोकांना होत असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले.