कोरोनामुळे आठवडाभरात २६६ जणांचा मृत्यू, तर दिवसाला रुग्ण संख्या ९ सहस्रोंच्या वर

कोरोनामुळे मुंबईतील स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक, वाढत्या रुग्णांना उपचार देण्याचे प्रशासनापुढे आव्हान

मुंबई – कोरोनामुळे मुंबईची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. ६ ते १२ एप्रिल या आठवडाभरात मुंबईमध्ये कोरोनाचे ६६ सहस्र ७७५ रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत कोरोनामुळे २६६ जणांचा मृत्यू झाला असून प्रत्येक दिवशी मुंबईतील ३८ नागरिकांना प्राण गमवावे लागत आहेत. आठवड्याच्या सरासरीनुसार प्रत्येक दिवसाला मुंबईत कोरोनाचे ९ सहस्र ५३९ रुग्ण आढळत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या रुग्णांना उपचार कसे उपलब्ध करून द्यायचे ? ही मोठी समस्या प्रशासनापुढे निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे खासगी आणि शासकीय रुग्णालयांतील खाटा अपुर्‍या पडत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न होऊनही रुग्णांना उपचारासाठी कुठे भरती करायचे ? ही समस्या प्रशासनापुढे आहे. यावर उपाय म्हणून महानगरपालिकेने खासगी हॉटेल्समध्ये ‘कोविड केअर सेंटर’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे आणि ज्यांना हॉटेल्सचे भाडे देणे शक्य आहे, अशा रुग्णांना हॉटेलमधील ‘कोविड केअर सेंटर’मध्ये हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. १२ एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे मुंबईतील १२ सहस्र २३ नागरिकांचा मृत्यू झाला असून ५ लाख २७ सहस्र ११९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मुंबईतील ९१९ इमारती सीलबंद करण्यात आल्या आहेत, तर ८५ ठिकाणे प्रतिबंधात्मक क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता येथे काही दिवसांत कडक निर्बंध न पाळल्यास मुंबईतील परिस्थिती हाताळणे प्रशासनासाठी जिकिरीचे ठरणार आहे.