पुरावे नष्ट केल्याच्या कारणावरून निलंबित पोलीस अधिकारी रियाझ काझी यांना अटक !

अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिन आढळल्याचे प्रकरण

डावीकडून रियाझ काझी,सचिन वाझे

मुंबई – मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटीन ठेवल्याच्या प्रकरणात सहभाग असल्याच्या कारणावरून सचिन वाझे यांचे साथीदार रियाझ काझी यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी काझी यांनी सचिन वाझे यांना साहाय्यक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मागील मासात रियाझ काझी यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. ११ एप्रिल या दिवशी त्यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अन्वेषणासाठी बोलावले होते. अन्वेषणानंतर त्यांना अटक करण्यात आली.

स्फोटकांचे प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यावर सचिन वाझे यांनी गाडीच्या प्लेट सिद्ध करून घेतलेल्या विक्रोळी येथील दुकानात जाऊन रियाझ काझी यांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज आणि संगणक कह्यात घेतला. सचिन वाझे यांच्या घराच्या बाजूचे सीसीटीव्ही फुटेजही ते  घेऊन गेले होते. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे.