भाजपच्या खासदाराकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पुजार्याचा मृतदेह ठेवून आंदोलन
काँग्रेसच्या राज्यात मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण केले जाते आणि पोलीस, प्रशासन भूमाफियांना मिळालेले असल्याप्रमाणे निष्क्रीय रहातात, हे लक्षात घ्या !
जयपूर (राजस्थान) – राज्याच्या दौसा जिल्ह्यातील महवामध्ये पुजारी शंभु शर्मा यांचे ७ दिवसांपूर्वी निधन झाले होते. भूमाफियांनी मंदिराच्या भूमीवर अतिक्रमण केल्याने शर्मा निराश झाले होते आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे ‘भूमाफियांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही’, असे भाजपचे खासदार डॉ. किरोडीलाल मीणा यांनी सांगत गेले ६ दिवस मृतदेह तसाच ठेवून आंदोलन चालू केले आहे. त्यांनी ७ व्या दिवशी शर्मा यांचा मृतदेह मुख्यमंत्री निवासस्थानाजवळील सिव्हिल लाईन येथे नेऊन ठेवला आणि भूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी केली. यामुळे पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करून त्यांना पळवून लावले. (पुजार्यांचा मृतदेह तसाच ठेवून आंदोलन केले जात असतांनाही काँग्रेस भूमाफियांच्या विरोधात कारवाई करण्यास सिद्ध होत नाही, यातून त्याची जनताद्रोही मनोवृत्ती दिसून येते ! – संपादक)
डॉ. किरोडीलाल मीणा यांनी म्हटले की, जोपर्यंत पुजार्याच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही. शर्मा यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषींना अटक करण्यात यावी. तसेच राजस्थानमधील मंदिरांच्या भूमीवर झालेले अतिक्रमण हटवण्यात यावे, अशी मागणी मीणा यांनी केली.
( सौजन्य : जयपूर न्यूज )