कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्यास केंद्र सरकारची अनुमती !
पुणे – कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्यास केंद्र सरकारने ७ एप्रिल या दिवशी अनुमती दिली असल्याने खासगी आस्थापनातील ४५ वर्षांपुढील कर्मचारी आणि अधिकारी यांना कामाच्या ठिकाणी लस मिळणार आहे. पुण्यातील २५ खासगी आस्थापनांनी त्यांच्या अनुमाने १२ सहस्र कर्मचार्यांचे लसीकरण कामाच्या ठिकाणी करण्यासाठी महापालिकेचे सहकार्य मागितले आहे. एम्.सी.सी.आय.ए.चे (मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे) अध्यक्ष सुधीर मेहता, महासंचालक प्रशांत गिरबने यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका यांच्याकडे कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्याची व्यवस्था स्थानिक प्रशासनाने करावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब नियोजन मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी हा आदेश लागू केला आहे.
आस्थापनांमध्ये लसीकरण झाल्यास महापालिका किंवा स्थानिक प्रशासनावरील ताण अल्प होईल. यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची सिद्धता आस्थापनांनी यापूर्वीच दर्शवली आहे. याविषयी एक बैठक घेऊन लवकरच आराखडा निश्चित करण्यात येईल, अशी माहिती गिरबने यांनी दिली.