पाकच्या मानवाधिकार आयोगाकडून इम्रान खान यांच्यावर टीका
|
इस्लामाबाद (पाकिस्तान) – बलात्कार किंवा लैंगिक शोषण अश्लीलतेमुळे होतेे. ही अश्लीलता पाश्चिमात्य आणि भारतीय संस्कृती यांतून येते, असे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका प्रश्नाचे उत्तर देतांना केले. यामुळे पाकमधूनच त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. खान यांनी पाकच्या नागरिकांशी दूरभाषवर चर्चा केली. या वेळी एका नागरिकाने त्यांना बलात्काराच्या वाढत्या घटनांवर प्रश्न विचारला होता. त्या वेळी त्यांनी वरील उत्तर दिले.
१. इम्रान खान यांच्या विधानावर पाकच्या मानवाधिकार आयोगाने म्हटले की, जनतेचे नेते म्हणून त्यांनी जे वक्तव्य केले आहे ते अमान्य आहे. या वक्तव्यातून बलात्कार का, कसे आणि कुठे होतात याविषयीचे अज्ञान तर दिसतच आहे, समवेत यात पीडितांना दोषी ठरवण्यात येत आहे. बलात्काराचे बळी लहान मुलेही ठरतात, हे सरकारला ठाऊक असायला हवे. आम्ही ‘इम्रान खान यांनी तात्काळ क्षमा मागावी’, अशी मागणी करतो. सरकारने बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी कटीबद्धता दाखवली पाहिजे.
२. पाकिस्तान सरकारकडून मागील वर्षी घोषित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पाकमध्ये प्रतिदिन बलात्काराच्या ११ घटना होतात. वास्तविक बलात्काराची आकडेवारी यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे सांगितले जाते.