डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांनी कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी मडगाव येथे मुसलमानांकडून धरणे आंदोलन

  • धरणे आंदोलनाचे सामाजिक माध्यमात निमंत्रण देतांना महंत यति नरसिंहानंद यांना उद्देशून अपशब्दाचा वापर

  • ‘राष्ट्रीय हिंदू वाहिनी संघा’कडून धरणे आंदोलनावरून मडगाव येथील उपजिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

  • महंत यति नरसिंहानंद यांच्या पाठिंब्यासाठी गोव्यातील हिंदुत्वनिष्ठ ९ एप्रिलला एकत्र येणार !

महंत यति नरसिंहानंद

मडगाव, ७ एप्रिल (वार्ता.) – देहलीच्या प्रेस क्लबमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये गाझियाबादच्या डासनामधील मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांनी इस्लाम आणि महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित विधानावरून मडगाव येथे ‘अखिल गोवा अहले सुन्नत वज जमात’ या संघटनेच्या बॅनरखाली मुसलमानांनी ६ एप्रिल या दिवशी धरणे आंदोलन केले. विशेष म्हणजे राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी संचारबंदी आदेश लागू असतांना आणि शासनाने सार्वजनिक ठिकाणी एकत्रीकरण करता येणार नसल्याचे स्पष्टपणे घोषित केलेले असूनही हे धरणे आंदोलन करण्यात आले. (असे असतांना मडगावचे पोलीस काय करत होते ? हिंदूंच्या संदर्भात त्यांनी असेच दुर्लक्ष केले असते का ? – संपादक) या पार्श्‍वभूमीवर ‘राष्ट्रीय हिंदू वाहिनी संघा’चे राष्ट्रीय सचिव राजीव झा यांनी शासकीय नियमांचे उल्लंघन करणार्‍या आणि धार्मिक सलोखा बिघडू शकणार असलेल्या या धरणे आंदोलनावरून मडगाव येथील उपजिल्हाधिकार्‍यांकडे आक्षेपवजा तक्रार नोंदवली आहे. त्याचप्रमाणे गोव्यातील काही हिंदुत्वनिष्ठांनी ‘अखिल गोमंतकीय हिंदू’ या बॅनरखाली महंत यति नरसिंहानंद यांच्या पाठिंब्यासाठी एकत्र जमण्याचे समस्त हिंदूंना आवाहन केले आहे. ‘मडगाव नगरपालिकेजवळ ९ एप्रिलला दुपारी ४ वाजता जमून हिंदूंची शक्ती दाखवून द्या’, असे आवाहन करण्यात आले आहे.

या धरणे आंदोलनात ‘अखिल गोवा अहले सुन्नत वज जमात’ या संघटनेचे कार्यकर्ते मडगाव येथील नगरपालिकेसमोर उद्यानाच्या बाहेर ‘मी महंमदवर प्रेम करतो’, ‘महंत यति नरसिंहानंद यांना कह्यात घ्या’, ‘महंत यति नरसिंहानंद यांना फाशी द्या’, अशा आशयाचे फलक घेऊन रांगेत उभे होते. आंदोलनात कार्यकर्ते दाटीदाटीने उभे राहिल्याने सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमाचे उल्लंघन करण्यात आले. या आंदोलनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यावर ‘राष्ट्रीय हिंदू वाहिनी संघा’चे राष्ट्रीय सचिव राजीव झा यांनी राज्यात संचारबंदी लागू असतांना आयोजित करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनाच्या विरोधात मडगाव येथील उपजिल्हाधिकार्‍यांकडे लेखी स्वरूपात आक्षेपवजा तक्रार नोंदवली. (या तक्रारीची प्रशासनाने नोंद घेऊन योग्य ती कारवाई करावी अन्यथा भारतातील कायदे केवळ हिंदूंसाठीच आहेत, असे हिंदूंनी समजल्यास गैर ठरू नये ! – संपादक) राजीव झा या आक्षेपवजा तक्रारीत म्हणतात, ‘‘या धरणे आंदोलनाच्या ‘व्हिडिओ’समवेत प्रसारित होत असलेल्या संदेशात महंत यति नरसिंहानंद यांना अपकीर्त करणारा शब्द वापरण्यात आला आहे. याद्वारे मुसलमानांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी एकत्रीकरण झाल्याने शासनाच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे, तसेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.’’