प्रशासकीय कामात माझ्याकडून राजकीय हस्तक्षेप केला जाणार नाही ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

दिलीप वळसे पाटील

मुंबई – पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी पावले टाकणे आवश्यक आहे. मी स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न करीन. पोलिसांच्या स्थानांतरामध्ये जे अधिकार दिलेले आहेत, त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. प्रशासकीय कामात माझ्याकडून राजकीय हस्तक्षेप केला जाणार नाही, असे आश्‍वासन नवनियुक्त गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

६ एप्रिल या दिवशी मंत्रालयात येऊन दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपदाचे दायित्व स्वीकारले. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी वरील वक्तव्य केले.

या वेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘‘हा अवघड काळ आहे. कोरोनामुळे सर्व पोलीसबळ रस्त्यावर कार्यरत आहे. या मासात विविध धर्मियांचे सणही आहेत. प्रत्येक वर्गाच्या अपेक्षा वेगळ्या असतात. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यासाठी आवश्यक त्या आजी-माजी पोलीस अधिकार्‍यांचा मी सल्ला घेईन. पोलीस भरती, पोलिसांसाठी घरे बांधणे, शक्ती कायदा आणणे या गोष्टी मला पुढील काळात करावयाच्या आहेत.’’

पत्रकारांना माहिती देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणार !

छोट्या छोट्या प्रकरणांच्या अन्वेषणाची माहिती पत्रकारांना मिळावी, यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करू, असे या वेळी दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला महाराष्ट्र शासन आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला महाराष्ट्र शासन आणि अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देतांना बाजू ऐकून न घेता निर्णय दिल्याचे देशमुख यांनी अपिलामध्ये म्हटले आहे. महाराष्ट्र शासन आणि अनिल देशमुख यांनी स्वतंत्रपणे सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे.