‘कंटेनमेंट झोन’मध्ये लावलेल्या बांबूंचे धुळे महापालिकेने काढले ९५ लाख रुपयांचे देयक !

भ्रष्टाचार झाल्याचा सत्ताधारी नगरसेवक शीतल नवले यांचा आरोप

प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांना शासन करायला हवे !

धुळे – कोरोनाच्या काळात शहरातील काही भाग ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आले होते. या ठिकाणी सुरक्षिततेचा उपाय म्हणून लावलेल्या बांबूंचे महापालिकेने ९५ लाख रुपयांचे देयक काढले आहे. हे देयक मान्यतेसाठी ३ एप्रिल या दिवशी स्थायी समितीच्या सभेत ठेवण्यात आले होते; मात्र ‘यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे’, असा आरोप सत्ताधारी भाजपचे नगरसेवक शीतल नवले यांनी केला आहे.

शहरातील विविध ठिकाणी घोषित केलेल्या ‘कंटेनमेंट झोन’साठी ‘धनलक्ष्मी मंडप डेकोरेटर्स’ला ठेका देण्यात आला होता; मात्र यासाठी लावण्यात आलेल्या बांबूंचे देयक ९५ लाख रुपये काढण्यात आले. प्रत्येकी २८ सहस्र ६०० रुपये इतके देयक एका ‘कंटेनमेंट झोन’साठी लावण्यात आले आहे.

भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाची चेतावणी

‘या देयकांची सखोल चौकशी करून भ्रष्टाचार करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच जळगाव महापालिकेप्रमाणेच येथील महापालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध स्वतः आवाज उठवणार आहे. भ्रष्टाचार करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल’, अशी चेतावणी नगरसेवक शीतल नवले यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.