एकीकडे ‘ऑनलाईन’ शिक्षण देणारे शिक्षण खाते विद्यार्थ्यांच्या मूलभूत अडचणीही सोडवू शकत नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागते. सरकारी यंत्रणांसाठी यापेक्षा लज्जास्पद गोष्ट दुसरी कुठली असू शकते. शिक्षण खाते आता तरी विद्यार्थ्यांच्या अशा समस्या सोडवणार आहे का ?
अकोला – दळणवळण बंदीमुळे शाळा ‘ऑनलाईन’ माध्यमातून चालू आहे; मात्र गरिबीमुळे ‘स्मार्टफोन’ घेऊ शकत नसल्याने इयत्ता १० वीतील पायल गवई (वय १५ वर्षे) या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. तिच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. तिला एक बहीण आणि एक भाऊ आहे. पायल अभ्यासात हुशार होती; पण शाळेच्या वतीने घेण्यात येणार्या सराव परीक्षांना ती भ्रमणभाष नसल्यामुळे उपस्थित राहू शकली नाही.
‘इयत्ता १० वीच्या परीक्षेत मी अनुत्तीर्ण होईन. मी पुष्कळ तणावात आहे’, असे ती वारंवार भावाला सांगत असे. तिला भविष्यात पोलीस अधिकारी व्हायचे होते.