फाल्गुन पौर्णिमा (२८.३.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्या श्रीमती आदिती देवल यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सहसाधिकेला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. साधी रहाणी
‘देवलकाकू सधन घराण्यातील असूनही त्या नेहमीच्या वापरासाठी साड्यांचे दोनच जोड वापरतात; मात्र सणाच्या दिवशी त्या आवर्जून चांगली साडी नेसतात.
२. सातत्य
त्यांचे प्रत्येक गोष्टीत सातत्य आहे.
अ. त्या त्यांच्या वैयक्तिक गोष्टी ठरलेल्या वेळेत करतात.
आ. त्या संगणक पुसायचे कापड नियमितपणे ठरलेल्या दिवशी धुतात.
इ. त्या योगासनांच्या वर्गाला नियमितपणे जातात.
ई. सकाळी केर काढणार्या साधकाला अडचण होऊ नये; म्हणून त्या झोपायला जाण्यापूर्वी आठवणीने सेवेच्या ठिकाणी असलेल्या सर्व खुर्च्या एका बाजूला करून ठेवतात.
३. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
त्या सारणीलिखाण, नामजपादी उपाय नियमितपणे आणि भावपूर्णरित्या करतात. त्या स्वयंसूचनांची सत्रेही ठरलेल्या वेळेत करतात. त्या कुठल्याच बाबतीत सवलत घेत नाहीत. त्या कधीही अनावश्यक विश्रांतीही घेत नाहीत.
४. प्रेमभाव
अ. आगाशीत वाळत घातलेले स्वतःचे कपडे आणतांना त्या त्यांच्या खोलीत रहाणार्या सहसाधिकांचे कपडेही काढून आणतात. कपडे वाळले असतील, तर त्यांच्या घड्या घालून ठेवतात आणि कपडे ओले असतील, तर दोरीवर वाळत घालतात. त्यांना खोलीतील साधिका कोणत्याही सेवा करू देत नाहीत; म्हणून कृतज्ञतेपोटी हे सर्व करतात.
आ. एकदा एका साधिकेला अकस्मात् त्यांच्या खोलीत रहावे लागले. तेव्हा काकूंनी तिला अंथरूण-पांघरूण दिले आणि नंतर ते स्वतःहून धुऊनही ठेवले.
५. दिसेल ते कर्तव्य
त्या जेवायला गेल्यावर ताटे, वाट्या अल्प असतील, तर स्वतः वाढून न घेता इतरांचा विचार करून मांडणीतून ताटे, वाट्या आणून ठेवतात. जमिनीवर काही सांडले असेल, तर स्वयंपाकघरातून फडके आणून ते पुसून मगच जेवायला घेतात. येता-जाता मार्गिकेत किंवा सगळीकडे त्यांचे लक्ष असते. काही न्यूनता जाणवली, तर ती सुधारून मग त्या सेवेला बसतात.
६. इतरांचा विचार करणे
त्या वयस्कार असूनही आणि त्यांना शारीरिक त्रास असूनही त्या आदल्या दिवशीचे शेष राहिलेले पदार्थ घेतात.
७. मायेतून अलिप्त
त्या पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात रहायला येतांना त्यांनी स्वतःसाठी काही ठेवले नाही. त्यांनी सर्व वस्तू संस्थेला अर्पण केल्या. त्यांना कुठल्याच गोष्टीची आसक्ती नाही. त्या आश्रमजीवनाशी पूर्णपणे एकरूप झाल्या आहेत.
८. सेवेची तळमळ
अ. त्या एकाग्रतेने आणि मनापासून सेवा करतात. सेवा करतांना त्यांना सभोवतीचे भान नसते.
आ. त्यांना सेवा करून कंटाळा आल्याचे कधीही मला जाणवले नाही. त्या मोठ्या धारिकांचे संकलनही सहजतेने करतात.
इ. त्यांची सेवा म्हणजे बुद्धी आणि भाव यांचा संगम असतो. सेवेला आरंभ करण्यापूर्वी भावपूर्ण प्रार्थना करणे, प्रत्यक्ष सेवा करतांना बुद्धीचा योग्य प्रकारे वापर करणे, न समजलेले विचारून धारिका परिपूर्ण करणे आणि सेवा झाल्यावर पटलावर डोके टेकवून त्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करतात, ते पहाण्यासारखे असते.
ई. आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांना नामजप शोधून देणे ही त्यांची सेवा आहे. त्या ‘केवळ नामजप शोधून दिला आणि सेवा संपली’, असे न करता नामजप शोधून दिल्यावर ‘त्या साधकाला बरे वाटू दे’, अशी भावपूर्ण प्रार्थना करतात अन् ‘त्या साधकाला नामजपामुळे बरे वाटत आहे ना ?’, याची निश्चितीही करतात. बरे वाटत नसल्यास पुन्हा नामजप शोधून देणे किंवा विचारून घेऊन त्याला नवीन उपाय सांगणे, असेही त्या करतात. यात ‘संबंधित साधकाला बरे वाटावे’, अशी त्यांची तळमळ असते.
९. वेळेचे गांभीर्य असणे
सेवेचा वेळ वाया जातो; म्हणून त्या नातेवाइकांशी अनावश्यक बोलण्यात वेळ घालवत नाहीत, तरीही त्यांची त्यांच्या सर्व नातेवाइकांशी जवळीक आहे. काकूंना त्यांच्या वाढदिवसाला किंवा सणांच्या दिवशी त्यांच्या नातेवाइकांचे आवर्जून भ्रमणभाष येतात.
१०. चुकांविषयी संवेदनशीलता
एकदा काकूंकडून एक चूक झाली. तेव्हा त्यांनी ‘७ दिवस दुपारचा महाप्रसाद घेणार नाही’, असे प्रायश्चित्त घेतले. काही साधिकांनी त्यांना सांगितले, ‘‘असे प्रायश्चित्त न घेता दुसरे प्रायश्चित्त घ्या.’’ तेव्हा काकू म्हणाल्या, ‘‘फलकावर चूक आणि प्रायश्चित्त लिहिले, म्हणजे ते गुरुदेवांपर्यंत पोचले. आता प्रायश्चित्तात पालट करायला नको.’’ त्यांच्यातील या भावामुळेच त्यांना दुपारी महाप्रसाद ग्रहण न करण्याचा काहीही त्रास झाला नाही.
११. समष्टी तळमळ
त्या व्यष्टी साधनेची सांगड चांगल्या प्रकारे घालतातच. त्यासह अन्य साधकांनाही साधनेत साहाय्य करतात. व्यष्टी साधना चांगली होण्यासाठी योग्य दृष्टीकोन देणे, यासह काही चुकीचे लक्षात आल्यास तत्त्वनिष्ठपणे त्या संबंधित साधकाला त्याची जाणीव करून देतात. काही सुधारणा जाणवली नाही, तर पुढे सांगून त्या साधकात सुधारणा होईपर्यंत त्या पाठपुरावाही घेतात.
१२. त्यांचा परात्पर गुरुदेवांप्रती उत्कट भाव आहे. त्यांच्यातील परात्पर गुरुदेवांप्रतीचा भाव त्यांचे बोलणे आणि कृती यांतून जाणवतो. त्यांना परात्पर गुरुदेवांनी सांगितलेले प्रत्येक सूत्र आचरणात आणण्याची तळमळ आहे.
मला अशा गुणी साधिकेच्या सहवासात ठेवल्याविषयी मी परात्पर गुरुदेवांप्रती कृतज्ञ आहे.’
– सौ. अंजली श्रीराम काणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.३.२०२१)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |