अधिकार्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा चिठ्ठीत उल्लेख
मुंबई – अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत येणार्या हरिसाल वन परिक्षेत्रात कार्यरत असलेल्या वन अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी अधिकार्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे.
दीपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरून त्यांनी ठपका ठेवलेले उपवनसंरक्षक शिवकुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांचा शोध पोलीस घेत आहेत. रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दीपाली चव्हाण यांनी दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत त्यांचा पाठलाग केला होता. त्यामुळे त्यांची ‘सिंघम’ अशी ओळख झाली होती. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये अधिकार्यांकडून वेळोवेळी मुस्कटदाबी केली जात होती. गर्भवती असतांना त्यांना सुट्टी दिली जात नव्हती. त्यांचे वेतन रोखून धरले जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.