श्रोत्यांसाठी सादर केलेले ‘सामान्य गायन’ आणि ईश्‍वराच्या चरणकमली समर्पित करण्यासाठी केलेली ‘नादोपासना’ यांविषयी पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी केलेले चिंतन !

(पू.) सौ. उमा रविचंद्रन्

‘अलीकडेच मी ‘यू ट्यूब’वर तमिळ भाषेतील एक चर्चासत्र पाहिले. या चर्चासत्राचा विषय होता, ‘कर्नाटक शास्त्रीय संगीता’मध्ये गायक-कलाकार श्रेष्ठ कि रसिक श्रोते श्रेष्ठ ?’ हा कार्यक्रम थोडा वेळ पाहिल्यावर मला वाटले, ‘अपेक्षा ठेवून गाणारा कलाकार आणि स्वतःच्या सुख-समाधानासाठी ऐकणारा श्रोता, हे दोघेही श्रेष्ठ नाहीत, तर ‘ईश्‍वरार्पण करणे’, म्हणजेच आपली कला किंवा विद्या ईश्‍वरचरणी अर्पण करणे, हे श्रेष्ठ आहे.’

१. भगवान श्रीकृष्णाचे ‘विभूतीयोग’ या अध्यायातील वचन

यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।

तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसम्भवम् ॥

                          – भगवद्गीता, अध्याय १०, श्‍लोक ४१

अर्थ : जी जी ऐश्‍वर्ययुक्त, कांतीयुक्त आणि शक्तीयुक्त वस्तू आहे, ती ती तू माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज.

२. व्यक्तीकडे असलेली प्रतिभा ही भगवंताची विभूती !

आपल्याकडे जी प्रतिभा, सौंदर्य किंवा सामर्थ्य आहे, ते परमेश्‍वराच्या विपुल प्रमाणात असलेल्या विभूतींचे छोटेसे प्रतिबिंब आहे. त्यामुळे ‘मी चांगले गातो किंवा चांगले नृत्य करतो’, असे म्हणून बढाई मारणारे आपण कोण ?

३. भगवंताचे गुणगान करणार्‍या संतांनी त्यांची प्रतिभा इष्टदेवतेच्या चरणी अर्पण केली असल्याने आजही त्यांची गीते मनात भक्तीरस निर्माण करत असणे

भगवंताचे गुणगान करणारे संत कधीही शेकडो श्रोते किंवा रसिक यांच्यापुढे गायले नाहीत, तसेच त्यांचे ‘चाहते मंडळ’ही (‘फॅन क्लब’ही) नव्हती. ते केवळ त्यांच्या शिष्यांपुढे गायचे, तरीही त्यांची गीते काळाच्या कसोटीवर उतरली असून आजही ती लोकांच्या मनात भक्तीरस निर्माण करतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी त्यांची प्रतिभा, म्हणजेच त्यांच्यातील (ईश्‍वराची) विभूती त्यांच्या इष्टदेवतेच्या चरणी अर्पण केली आहे. त्यांनी लोकेषणा, प्रसिद्धी किंवा पैसा यांपैकी कशाचीही अभिलाषा बाळगली नाही.

३ अ. त्यागराज यांनी स्वतःची सर्व गीते श्रीरामाच्या चरणी समर्पित केली असल्यामुळे तंजावरच्या राजाने दिलेल्या गाण्याच्या निमंत्रणाला त्यांनी नकार देणे : ‘कर्नाटक शास्त्रीय संगीता’चे रचनाकार त्यागराज (वर्ष १७६७ ते १८४७) यांनी गायलेले तेलुगु भाषेतील एक गीत आहे, ‘निधी चाल सुखम्, रामुडु सन्नीधी चाल सुखम् ।’, म्हणजे ‘आनंद कशाने प्राप्त होतो ? संपत्तीने कि श्रीरामाच्या सान्निध्याने ?’ एकदा तंजावरच्या राजाने त्यागराज यांना त्यांच्यासमोर गाण्यासाठी बोलावले होते. तेव्हा त्यागराज यांनी स्वतःची सर्व गीते इष्टदेवतेच्या, म्हणजे श्रीरामाच्या चरणी समर्पित केली असल्यामुळे लोकांसमोर गाण्यास नकार दिला. त्या प्रसंगी त्यांनी हे गीत गायले होते.

४. ऐहिक सुखासाठी गायलेले संगीत आणि ईश्‍वराला समर्पित केलेले संगीत

४ अ. प्रेक्षकांसमोर गीत सादर केल्याने कलाकाराला भौतिक सुख मिळणे; परंतु कला आणि प्रतिभा ईश्‍वराच्या चरणी समर्पित केल्याने ‘नादोपासना’ होणे : आपण जेव्हा प्रेक्षकांसमोर गीत सादर करतो, तेव्हा ते सामान्य संगीत होते; म्हणजेच गायक आणि श्रोते असलेली संगीताची एक मैफील होते. यातून आपल्याला भौतिक सुख मिळते; परंतु जेव्हा आपण आपली कला आणि प्रतिभा ईश्‍वराच्या चरणकमली समर्पित करतो, तेव्हा ती ‘नादोपासना’ होते. ‘नादाची उपासना’, हा ईश्‍वरापर्यंत पोचण्याचा आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा एक सोपा मार्ग आहे.

४ आ. सामान्य संगीतामुळे अहंकार वाढणे, तर ‘नादोपासने’मुळे अहं न्यून व्हायला साहाय्य होणे : प्रेक्षकांसमोर गायन सादर केल्यामुळे आपला अहंकार, तसेच अभिमान वाढण्याची शक्यता असते. याउलट ‘नादोपासने’मुळे आपले अस्तित्व न्यून होते आणि आपल्यातील परमात्म्याची अनुभूती आल्याने आपला अहं न्यून व्हायला साहाय्य होते.

४ इ. कलाकारांमधील तीव्र अहंकारामुळे ते अनिष्ट शक्तींचे सहज लक्ष्य ठरणे, तर ईश्‍वरचरणी जीवन समर्पित केलेल्या संतांच्या संपूर्ण जीवनावर ईश्‍वराचे नियंत्रण असणे : ‘कर्नाटक शास्त्रीय संगीत’ गाणार्‍या काही नामवंत कलाकारांमध्ये तीव्र अहंकार असल्यामुळे ते अनिष्ट शक्तींचे सहज लक्ष्य ठरतात आणि त्या त्यांच्यावर नियंत्रणही मिळवतात. याच कारणामुळे काही गायक धर्म आणि कर्नाटक शास्त्रीय संगीत यांच्या मूलभूत सिद्धांतांच्या विरोधात अधिकारवाणीने, उद्दामपणे आणि बेदरकारपणे बोलू लागतात. त्यामुळे संभ्रमात असलेल्या काही हिंदूंची दिशाभूल होते.

ईश्‍वरचरणी आपले जीवन समर्पित केलेल्या संतांच्या संदर्भात ईश्‍वरच त्यांना गीताचे बोल लिहिण्यास सुचवतो, त्यांच्याकडून त्याच्या (ईश्‍वराच्या) तालावर गाऊन आणि नाचून घेतो; म्हणजेच त्यांचे संपूर्ण जीवन तोच नियंत्रित करतो. आपल्याकडे याचे अनेक पुरावे आहेत, उदा. भक्त जयदेव यांनी लिहिलेल्या ‘अष्टपदी’तील त्यांनी खोडलेली ओळ भगवान श्रीकृष्णाने स्वतः येऊन पुन्हा लिहिली आणि ‘जयदेव यांनी लिहिलेले योग्य होते’, असे त्यांना आश्‍वस्त केले.

४ ऊ. सामान्य संगीतामुळे मन बहिर्मुख, तर कला ईश्‍वराला समर्पित केल्याने मन अंतर्मुख होणे : जेव्हा आपण श्रोत्यांसमोर गीत सादर करतो, तेव्हा स्वतःचे मन बहिर्मुख होते. याउलट जेव्हा आपण आपली कला ईश्‍वराला समर्पित करतो, तेव्हा स्वतःचे मन अंतर्मुख होते.

४ ए. श्रोत्यांच्या आवडीचा विचार केल्याने काही वेळा शास्त्रीय संगीतात तडजोड केली जाणे आणि ‘ईश्‍वरार्पण’ केलेली कला मात्र मूळ शुद्ध रूपात अर्पण होणे : श्रोत्यांसमोर गीत सादर करतांना काही वेळा श्रोत्यांची आवड, कल आणि अभिरुची यांना प्राधान्य दिल्यामुळे शास्त्रीय संगीतात तडजोड केली जाते. त्यामुळे त्याच्या शुद्धतेला दुय्यम स्थान प्राप्त होते. याउलट जेव्हा आपली कला ‘ईश्‍वरार्पण’ होते, तेव्हा तेथे तडजोड नसल्यामुळे ती तिच्या मूळ शुद्ध रूपात असते. केवळ संगीतातच असे अनुभवता येते आणि जगातील चल-अचल वस्तूंवर त्याचा प्रभाव पडतो.

४ ऐ. श्रोत्यांसाठी गाणार्‍या गायकातील भक्तीभावानुसार ते गायन शक्ती किंवा अधिकतर भाव या स्तरांवरील असते. याच्या तुलनेत ‘नादोपासना’ करणार्‍या संतांचे संगीत हे चैतन्य, आनंद आणि शांती या स्तरांवरील असते.

५. कलाकार गुरु-शिष्यांनी देवासमोर भावपूर्ण गायन सादर करून लोकांच्या मनात भक्तीभाव रुजवणे आणि दैवी संगीतातील सामर्थ्यामुळे अनेक दैवी चमत्कार घडलेले असणे

आपल्याकडे असलेली कला किंवा विद्या ईश्‍वरार्पण करणे, हे सर्वांत महत्त्वाचे आहे. असे केले, तरच तो आपला ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग ठरू शकतो. मग असा प्रश्‍न निर्माण होतो की, जर कुणीच गायन सादर केले नाही, तर ‘कर्नाटक शास्त्रीय संगीत’ विकसित कसे होणार ? संगीतप्रेमींना संगीतातील दैवी आनंद कसा अनुभवता येणार ? संगीत ईश्‍वराला समर्पित करण्याची उत्कृष्ट परंपरा पुढे चालू रहावी, यासाठी आपल्या सनातन धर्माने आपल्याला गुरु-शिष्य परंपरा दिली आहे. ते (गुरु-शिष्य) मंदिरात देवासमोर गायचे आणि तेथे जमलेल्या भक्तांच्या मनात भक्तीभाव रुजवायचे. ‘आपले गाणे कोण ऐकत आहे ?’, याविषयी जरी ते अनभिज्ञ असले, तरी त्यांच्या गीतांतील शब्दांमधील चैतन्य आणि भावपूर्ण गायन यांमुळे ऐकणार्‍या भक्तांना त्या संगीताचा लाभ व्हायचा. केवळ अशा दैवी संगीतातच संत मीराबाईने प्राशन केलेल्या विषाचे अमृतात रूपांतर होण्याचे सामर्थ्य असते. संत माणिकवासागर यांना मिळालेल्या शिक्षेच्या वेळी भर उन्हात तापलेल्या वाळूचे रूपांतर शीतल जलात करण्याचे सामर्थ्य असते, तसेच संत कान्होपात्रा यांना भगवंतात विलीन करण्याचे, तर संत गोरा कुंभार यांच्या मृत मुलाला जिवंत करण्याचे सामर्थ्य असते.

‘हे प.पू. गुरुदेव, हे परमेश्‍वर, आपणच १४ विद्या आणि ६४ कला यांचे मूर्त स्वरूप आहात. आपल्या आठवणीने मिळणार्‍या आनंदाचा अंशात्मक भागही आम्हाला ऐहिक गोष्टींमधून मिळेल का ? हे भगवन्, हे प्रभो, तुमच्याच कृपेने आम्हाला तुमचे अखंड मनन, चिंतन आणि निदिध्यास लागू दे. आम्ही तुमच्या चरणकमली एकरूप होईपर्यंत आम्हाला तुमच्या अखंड स्मरणात राहता येऊ दे’, हीच प्रार्थना !’

– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई, तमिळनाडू. (२६.११.२०१८)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.