लेखक आणि उद्योजक शरद तांदळे यांच्यावर सरकारने कठोरात कठोर कारवाई करावी ! – राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी

हरिपाठ, पारायण, कीर्तन परंपरा यांची विटंबना करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण

शरद तांदळे

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २० मार्च (वार्ता.) – स्वतःला तथाकथित उद्योजक म्हणवणारे शरद तांदळे यांचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाला असून यामध्ये त्यांनी हरिपाठ, पारायण, कीर्तन परंपरा यांची विटंबना करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. लाखो लोकांच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या या समाजकंटकावर सरकारने कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. प्रसिद्धीपत्रकातील मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.

१. हिंदुस्थानात प्रतिदिन देव, संत, व्रत, ग्रंथ, साधू यांचा अपमान आणि टिंगल टवाळी होत आहे. तथाकथित लोकशाहीच्या नावांखाली, तसेच पुरोगामी सेक्युलर, सर्वधर्मसमभाव अशा गोंडस नावांखाली हिंदु धर्माच्या विरोधात षड्यंत्र चालू आहे. जगाच्या नकाशावर छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य निर्माण झाल्याविना जगातील प्रताडीत हिंदूंना न्याय मिळणार नाही.

२. स्वतःला उद्योजक म्हणवणारे तांदळे यांनी लक्षात घ्यावे की, पारायण आणि हरिपाठ करणार्‍या ज्या गरीब वारकरी मंडळीना ते ‘बावळट’ म्हणत आहे, अशा लाखो लोकांना पारायणासाठी, तसेच वारीसाठी पुष्कळ उद्योजक अन्नदान करतात. अनेक उद्योजकांची वारकर्‍यांप्रती श्रद्धा आणि निष्ठा आहे.

(म्हणे) ‘कीर्तनासाठी ५-५ लाख रुपये मिळतात, हा धंदा सोपा आहे !’ – शरद तांदळे

कीर्तन भक्तीसारख्या पवित्र भक्तीला धंदा म्हणणार्‍या शरद तांदळे यांची बौद्धिक दिवाळखोरी ! अशांना हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याविषयी कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

लेखक आणि उद्योजक शरद तांदळे यांनी एका व्याख्यानाच्या वेळी म्हटले होते की, खेड्यापाड्यांमध्ये पारायणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालतात. कीर्तन-पारायण म्हटले की, संपूर्ण गाव उपस्थित रहाते. यामध्ये ५-५ लाख रुपये मिळतात. आळंदीत याच्या संस्था आहेत. तिथे महाराज बनतात, मला हे नंतर समजले. महाराज बनवण्याचे क्लासेस घेण्याची वेळ आली आहे. यामध्ये पुष्कळ पैसे प्राप्त होतात; कारण आपल्यासारखी ८० टक्के जनता बावळट आहे. पैसे मिळवण्यासाठी कीर्तन आणि महाराज होणे, हे दोन धंदे चांगले आहेत.