‘मला साधनेच्या आरंभापासूनच अंजलीचा सहवास लाभला. प्रथम मानसिक स्तरावर असणारी आमची मैत्री तिच्या प्रयत्नांमुळे आध्यात्मिक स्तरावर होत गेली. देवाने मला तिच्या सहवासात असतांना तिचे अनेक गुण लक्षात आणून दिले. ते आज तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्याप्रती आणि गुरुमाऊलीच्या प्रती कृतज्ञता म्हणून व्यक्त करण्याचा प्रयत्न करते.
१. गुरुकार्याचा ध्यास
१ अ. सेवा चिकाटीने पूर्ण करणे आणि ‘स्वप्नातही सेवा करत आहे’, असे लक्षात येणे: कु. अंजलीच्या व्यक्तीमत्त्वाचा विचार केल्यास मला प्रथम तिची तळमळ लक्षात येते. ती तळमळीचे मूर्तीमंत रूप आहे. कितीही अडचणी आल्या, तरी ती प्रत्येक सेवा तळमळीने पूर्ण करते. ती अनेक दायित्वाच्या सेवा चिकाटीने पूर्ण करते. ती अनेक वेळा स्वप्नातही सेवा करत असल्याचे तिच्या लक्षात येते. (अनेक वेळा सकाळी करायचा असलेला समन्वय तिने रात्री झोपेत केलेला असतो आणि सकाळी उठल्यावर ‘तिला हे झाले आहे’, असे वाटत असते.) एकदा ती मला म्हणाली, ‘‘मला काल रात्री झोप लागली नाही. मी रात्रभर सेवेविषयी समन्वय करत होते. माझ्या मन आणि बुद्धी यांचे कार्य थांबतच नाही.’’
१ आ. सेवेच्या तळमळीमुळे अंजलीला आश्रम सुशोभीकरण, आश्रमांतर्गत प्रकल्प पूर्णत्वास नेणे अन् प्रसारांतर्गत अभिनव कल्पना सुचणे : तिच्यातील सेवेच्या तळमळीमुळे तिला ‘आश्रम सुशोभीकरणाच्या आणि आश्रमांतर्गत एखादा प्रकल्प पूर्णत्वास कसा नेऊ शकतो ? प्रसारात कुठली संकल्पना वापरू शकतो ?’, यांच्या अभिनव कल्पना सुचतात. मागील वर्षी कोरोना महामारीच्या कालावधीत दळणवळण बंदीमुळे प्रसारकार्य थांबले होते. तेव्हा ‘ऑनलाईन’ सत्संग, ‘ऑनलाईन’ बालसंस्कार आदींविषयी तिला चांगल्या कल्पना सुचल्या आणि त्याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला.
१ इ. रात्रीचा दिवस करून संतांचे आज्ञापालन करणे : तिच्याकडे अनेक वेळा अकस्मात् अनेक सेवा येतात. ‘संतांचे आज्ञापालन तत्परतेने आणि परिपूर्ण केले, तरच त्याचा साधनेसाठी पूर्ण लाभ होतो’, हे लक्षात ठेवून ती संतांनी सांगितलेल्या सेवा वेळेत पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करून धडपडते. ‘संत मला इतक्या हक्काने सेवा सांगतात’, याविषयी तिला पुष्कळ कृतज्ञता वाटते.
१ ई. एकदा मी एका संतांना सांगितले, ‘‘मी अंजलीच्या समवेत असतांना माझी तळमळ वाढते.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तिचा साधनेसाठी पूर्ण उपयोग करून घे.’’
२. सहजतेने जवळीक साधणे
अंजलीची साधनेत परिपक्वता असूनही तिच्यात सहजताही आहे. त्यामुळे आश्रमातील अनेक साधकांशी तिची मैत्री आहे.
३. त्यागी वृत्ती
तिला तिच्या वस्तूंविषयी आसक्ती नाही. तिला कुणी काही वस्तू दिली, तर ती स्वतःकडे न ठेवता ज्याला त्याची आवश्यकता आहे, त्यांना देते. ‘तिने त्या वस्तू जपून ठेवल्या आहेत’, असे मी आजपर्यंत बघितले नाही.
४. साधनेची तळमळ
ती साधनेत माझ्यापेक्षा पुष्कळ पुढे आहे, तरीही ती तिच्या लहान-सहान अडचणी मला सांगते आणि ‘कसे करू ?’, असे विचारते. ती आवश्यकतेनुसार अन्य मैत्रिणींचेही साहाय्य घेते. साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी ती संतांना अडचणी सांगून त्यावर मात करण्यासाठी अखंड प्रयत्नरत असते.
५. ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने सेवा केल्याने सहसाधकांमध्ये संघटितपणा वाढणे
अंजलीमध्ये ‘व्यापकता’ हा गुण मुरला असल्याने ती तिच्याशी संबंधित सेवेव्यतिरिक्त अन्य सेवाही करते. ती ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने जे लक्षात येईल, ते पुढे कळवणे, साधकांना सेवेत साहाय्य करणे आदी करत असते. त्यामुळे आश्रमातील अनेक साधक तिला हक्काने अडचणी सांगतात. ‘ती साहाय्य करेल’, असा विश्वास अनेक साधकांना वाटतो. ‘सहसाधकांचे दायित्व आपलेच आहे’, असा संस्कार तिने स्वतःवर केला आहे. त्यामुळे सर्व साधक एकमेकांना सेवेत साहाय्य करतात. यामुळे तिच्या सहसाधकांमधेही संघटितपणा पुष्कळ प्रमाणात वाढला आहे.
६. साधकांना तत्त्वनिष्ठतेने चुका सांगून साहाय्य करणे
ती साधकांना त्यांच्या चुकांची तत्त्वनिष्ठतेने जाणीव करून देते. ती साधकांना मानसिक स्तरावर न हाताळता प्रयत्नांची पुढची दिशा देते. माझ्यात पुष्कळ भावनाशीलता आहे. यामुळे आरंभी मला तिच्या बोलण्याचे वाईट वाटायचे; पण ती तितक्याच तत्त्वनिष्ठतेने माझ्या चुका सांगायची. ‘मी कसे प्रयत्न करायला हवेत’, हे सांगून ती मला साहाय्य करायची आणि नंतर कौतुक करून प्रोत्साहनही द्यायची. त्यामुळे मला आता चुका कळल्यावर वाईट वाटत नाही.
७. प्रेमभाव वाढवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे
एकदा तिला एका संतांनी तिच्यात प्रेमभाव अल्प असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिने स्वतःतील प्रेमभाव वाढवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले. आरंभी तिला सेवेतील व्यस्ततेमुळे साधकांच्या अडचणी लक्षात येत नसत. त्यानंतर तिने साधकांशी बोलणे, त्यांना आधार देणे, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, साधकांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना खाऊ देणे, साधकांचे कौतुक करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, चुका झाल्यास जाणीव करून देणे इत्यादी कृती मनापासून केल्या. आश्रमातील वयस्कर, रुग्णाईत, तीव्र आध्यात्मिक त्रास असणारे साधक यांना ती शक्य होईल, तेवढे साहाय्य करत असते. तिच्याकडून या कृती आता सहजतेने होतात.
८. भाव
तिचा ‘सनातन’ या शब्दाप्रती पुष्कळ भाव आहे. त्यामुळे सनातनशी संबंधित संत, साधक, आश्रम, वस्तू, सेवा आणि संपर्कात आलेला समाजातील कुठलाही घटक यांच्याप्रती तिचा भाव जाणवतो. ‘ते गुरूंसाठी इतके करतात, तर मी त्यांच्यासाठी किती आणि काय करू ?’, असे तिचे असते.
९. जाणवलेले पालट
अ. पूर्वीच्या तुलनेत आता तिच्या सर्व कृती सहजतेने होतात. ‘प्रत्येक कृतीतून तिची साधना होत आहे’, असे वाटते.
आ. पूर्वी ‘साधकांनी अधिक सेवा आणि साधनेचे प्रयत्न केले पाहिजेत’, अशी तिची अपेक्षा असायची. त्यामुळे ती कधी कधी दुःखी व्हायची; पण आता ‘साधकांची साधना व्हायला पाहिजे’, असे तिला वाटते. त्यामुळे तिचे साधकांना समजून घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
इ. पूर्वीच्या तुलनेत तिच्या आनंदातही वाढ झाली आहे.’
– सौ. नंदिनी चितळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.२.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |