हृदयाच्या शस्त्रकर्माच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेमुळे स्थिर रहाता येऊन गुरुकृपा अनुभवणारे श्री. विनय पानवळकर आणि त्यांच्या पत्नी सौ. नेहा पानवळकर !
१. हृदयाच्या शस्त्रकर्माच्या वेळी आनंद अनुभवणारे श्री. विनय पानवळकर !
१ अ. रामनाथी आश्रमात येईपर्यंत गुरुदेवांच्या कृपेने कसलाही त्रास न होणे : ‘मी उत्तर भारतात असतांना दोन मासांपूर्वी माझ्या छातीत दुखत होते; परंतु तेव्हाही माझे मन गुरुकृपेमुळे स्थिर होते. ‘गुरूंच्या कृपेमुळेच सर्व काही ठीक होणार आहे’, याची मला आतून निश्चिती वाटत होती. मी देहलीहून घरी जाण्यासाठी निघालो असतांना सद्गुरु पिंगळेकाकांनी मला आधी २ – ३ दिवस रामनाथी आश्रमात एका सेवेसाठी जाऊन यायला सांगितले. माझा व्यायाम आणि अन्य सराव मी रामनाथी आश्रमात येईपर्यंत चालूच होता. रामनाथी आश्रमात येईपर्यंत गुरुदेवांच्या कृपेमुळे मला कोणताच त्रास झाला नाही.
१ आ. गुरुकृपेमुळेच डॉ. मराठे यांच्या माध्यमातून सरकारी डॉक्टरांची भेट होणे आणि त्यांनी पुढील चाचण्या करण्यास आरंभ करणे : रामनाथी आश्रमात आल्यावर मी आधुनिक वैद्य डॉ. मराठे यांना दोन मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) मला झालेला त्रास (छातीत दुखण्याचा) सांगितला आणि नंतर ‘काहीही त्रास झाला नाही’, असेही सांगितले. डॉ. मराठे यांनी मला हृदयाच्या काही चाचण्या करण्यास सुचवले. ‘ईश्वरानेच डॉ. मराठेकाकांच्या माध्यमातून मला चाचण्या करण्यास सांगितले होते’, हे माझ्या नंतर लक्षात आले. माझ्या ‘स्ट्रेसटेस्ट’ करण्यात आल्या. त्यात हृदयाला रक्तपुरवठा अल्प होत असल्याची काही लक्षणे आढळली. डॉ. मराठेकाकांनी तातडीने बांबोळी येथील सरकारी रुग्णालयातील हृदयरोगतज्ञ डॉ. मंजुनाथ देसाई यांच्याशी बोलून घेतले. तेव्हा त्यांनीही मला तात्काळ भेटण्यास बोलावले आणि आवश्यकतेनुसार ‘अॅन्जिओग्रॉफी’ अथवा ‘अॅन्जिओप्लास्टी’ करण्याची सिद्धता दर्शवली. हे सर्व अचानक; परंतु सहजतेने आणि तत्परतेने घडत होते. त्या वेळी मी मात्र गुरुकृपेमुळे आतून स्थिरता आणि शांतता अनुभवत होतो.
१ इ. ‘अॅन्जिओग्रॉफी’ झाल्यावर आजाराचे गांभीर्य लक्षात येणे : ७.२.२०१८ या दिवशी ‘अॅन्जिओग्रॉफी’ झाल्यावर माझ्या आजाराचे गांभीर्य आधुनिक वैद्यांच्या लक्षात आले. ‘हृदयाला रक्तपुरवठा करणार्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये ९५ टक्के अडथळा (ब्लॉकेज) निर्माण झाला होता. त्यामुळे तातडीने निर्णय घेणे आवश्यक होते; नाहीतर ‘हृदयविकाराचा तीव्र झटका येऊ शकला असता’, असे कळले.
१ ई. आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्मातील संभाव्य धोके सांगूनही ‘गुरुदेव सर्व यशस्वी करवून घेणार’, याची निश्चिती असणे आणि शस्त्रकर्माच्या वेळी ‘गुरुदेव’ हा जप चालू असणे : ९.२.२०१८ या दिवशी मला ‘अॅन्जिओप्लास्टी’च्या शस्त्रकर्माला सामोरे जावे लागले. या वेळी ‘शस्त्रकर्मापूर्वी कोणता धोका संभवतो’, याची पूर्वकल्पना सरकारी आधुनिक वैद्यांनी मला दिली. त्यांनी सांगितले, ‘‘यात किडनीला (मूत्रपिंडाला) धोका उद्भवण्याचा संभव असतो किंवा रक्तवाहिन्यांचा ब्लॉक मोकळा झाल्यावर तो कुठेही अडकून काहीही होऊ शकते.’’ हे सर्व कळल्यावरही मला निश्चिती होती की, ‘शस्त्रकर्म करणारे आधुनिक वैद्य कुणीही असोत, माझे गुरुदेवच हे सर्व यशस्वी करवून घेणार आहेत.’ देव कधीच चुकत नाही आणि चूक होऊ देत नाही. त्यामुळे अॅन्जिओप्लास्टी होत असतांना माझा ‘गुरुदेव’ हाच जप चालू होता.
१ उ. शस्त्रकर्म होतांना पुष्कळ आनंद जाणवून मनाची स्थिती स्थिर असणे आणि गुरुदेवांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी नवजीवनच दिल्याचे जाणवणे : मला शस्त्रकर्म होतांना पुष्कळ प्रमाणात आनंद जाणवत होता. ‘गुरुकृपेने शस्त्रकर्म यशस्वी होणारच’, याची मला आधीच निश्चिती होती. त्यामुळे शस्त्रकर्म झाल्यावरही माझ्या मनाची स्थिती स्थिरच होती. ‘मला होणार्या त्रासाची गंभीरता गुरुदेवांना आधीच माहिती होती; म्हणूनच त्याच्या कृपेने मी रामनाथी आश्रमात आलो होतो आणि तातडीने शस्त्रकर्म झाले होते’, हे माझ्या लक्षात आले. त्या वेळी ‘त्यांनी मला हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी नवजीवनच दिले आहे’, याची मला जाणीव झाली.
१ ऊ. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या मंत्रजपामुळे शस्त्रकर्म करतांना आणि नंतरही वेदना न झाल्याने त्यांच्या मंत्रांचे सामर्थ्य लक्षात येणे : शस्त्रकर्माच्या वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मला मंत्रजप दिला होता. त्यामुळे शस्त्रकर्म करतांना आणि नंतरही मला काहीही वेदना झाल्या नाहीत, तसेच सततच्या मंत्रजपामुळे ताकद लवकर भरून आली. त्यामुळे ८ दिवसांतच मला २ – ३ जिने चढता आणि उतरता येणे शक्य झाले. त्या वेळी त्यांच्या मंत्रजपातील सामर्थ्य माझ्या लक्षात आले.
गुरूंच्या कृपेमुळेच मला या प्रसंगात मनाने स्थिर रहाता आले. या गुरुकृपेसाठी मी श्री गुरुचरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. विनय पानवळकर, देवरुख, रत्नागिरी.
२. श्री. विनय पानवळकर यांच्या पत्नीला आलेल्या अनुभूती
२ अ. ‘यजमानांंची तातडीने ‘बायपास सर्जरी’ करावी लागणार आहे’, हे ऐकल्यावर प्रथम मन अस्थिर होणे, यजमानांची गुरूंवर श्रद्धा असल्याने त्यांनी स्वतःच हे स्थिर राहून सांगणे आणि तेव्हा ‘ते गुरूंच्या चरणांजवळ असल्याने गुरुकृपेने सर्वकाही चांगलेच होणार’, याची मनोमन निश्चिती होऊन स्थिर रहाता येणे : ‘माझ्या यजमानांची (श्री. विनय पानवळकर यांची) ‘अॅन्जिओग्रॉफी’ (‘Angiography’) झाली. त्यानंतर आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनीत ९५ टक्के ब्लॉकेज आहे. त्यासाठी तातडीने ‘बायपास सर्जरी’ करावी लागेल.’’ श्री. पानवळकरांनी मला भ्रमणभाष करून हे सांगितले. ‘बायपास सर्जरी करावी लागेल’, हे ऐकल्यावर प्रथम माझे मन अस्वस्थ आणि अस्थिर झाले. (त्या वेळी ते गोव्यात होते आणि मी देवरूख (जिल्हा रत्नागिरी) येथे घरी होते.) नंतर गुरुकृपेने लगेच माझ्या मनात विचार आला, ‘ज्यांची बायपास सर्जरी होणार आहे, ते गुरूंवर श्रद्धा ठेवून स्थिर राहून मला हे सांगत आहेत. मग मी का काळजी करू ? ते गुरूंच्या चरणांजवळ आहेत. ते आश्रमात गुरुदेव, सद्गुरु, संत आणि साधक यांच्या चैतन्यात आहेत. गुरुदेवच सर्व काही बघतील. माझ्यापेक्षा गुरुदेवांनाच त्यांची काळजी अधिक आहे. ’
या विचारांनी माझ्या मनातील नकारात्मक विचार लगेचच नष्ट झाले आणि थोड्याच वेळाने यजमानांचा पुन्हा भ्रमणभाष आला. ते म्हणाले, ‘‘गुरुकृपेने, ‘बायपास सर्जरी’ करायला नको. ‘अॅन्जिओप्लास्टी’ (‘Angioplasty’) करून चालेल असे ठरले आहे.’’
त्या वेळी ‘गुरुदेवांच्या कृपेने सर्वकाही चांगलेच होणार आहे’, याची मला मनोमन निश्चिती झाली.
२ आ. शस्त्रकर्माच्या वेळी आलेली अनुभूती
२ आ १. गुडघेदुखीचा त्रास असूनही अनेकदा जिने चढ-उतार करतांना गुडघे न दुखणे आणि गुरूंनीच त्यासाठी बळ दिल्याचे जाणवणे : ‘यजमानांचे शस्त्रकर्म झाले आणि त्यांना रुग्णालयातून जाण्याची अनुमती मिळाली. त्या वेळी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागली. त्यासाठी मला ६ वेळा पैसे भरण्याच्या कार्यालयापर्यंत ये-जा करावी लागली. प्रत्यक्षात माझे गुडघे पुष्कळ दुखतात. एक जिना चढले, तरी मला त्रास होतोे; परंतु या वेळी मी अनेकदा चढ-उतार करून आणि ये-जा करूनही माझे गुडघे दुखले नाहीत. त्या वेळी लक्षात आले, ‘गुरूंनीच माझ्या पायांना बळ दिले आहे.’
२ आ २. गुरुदेवांचे आपल्याकडे सदैव लक्ष असून आपणच ते समजून घेण्यास आणि अनुभवण्यास अल्प पडत असल्याची जाणीव होणे : अशीच अनुभूती मला आश्रमातही आली. यापूर्वी माझ्या मनात विचार यायचा, ‘गुरुदेवांचे माझ्याकडे लक्ष आहे कि नाही ?’; परंतु या प्रसंगातून आणि अनुभूतीतून लक्षात आले, ‘गुरुमाऊलींचे आपल्याकडे सदैव लक्ष असते.’
‘गुरुमाऊलीची ही कृपा समजायला आणि अनुभवायला मीच अल्प पडत होते’, याची मला जाणीव झाली.’
– सौ. नेहा विनय पानवळकर, देवरुख, जि. रत्नागिरी (१४.२.२०१८)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |