पणजी, १६ मार्च (वार्ता.) – एन्.सी.बी.चे (‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’चे) संचालक समीर वानखेडे यांनी गेल्या आठवड्यात किनारपट्टी भागातील रेव्ह पार्ट्यांच्या ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त करून गोवा पोलिसांची झोप उडवून लावली होती. या रेव्ह पार्ट्यांमध्ये ‘एल्एस्डी’ या अमली पदार्थाची विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. हा पुष्कळ महाग असून त्याला मोठी मागणी आहे. गोवा आणि महाराष्ट्र यांच्यासह उत्तर भारतातील आंतरराज्य टोळी या व्यापारामध्ये गुंतलेली असल्याची माहिती ‘एन्.सी.बी.’च्या अधिकार्यांनी दिली.
या छाप्यांमध्ये अधिकतर एल्एस्डी ब्लॉट पेपर्स, तसेच द्रव्य स्वरूपात अमली पदार्थ सापडले होते. एल्एस्डी हा अमली पदार्थ एखाद्या टपाल तिकिटासारख्या कागदाचा तुकडा असतो. हा जिभेवर ठेवल्यावर वितळतो आणि त्याची नशा चढू लागते. छोट्या नखाएवढ्या एल्एस्डी ब्लॉट पेपरची किंमत ३ ते ४ सहस्र रुपये असते. गोव्यात मोठ्या प्रमाणात देशी आणि विदेशी पर्यटक येत असतात. त्यामुळे या पर्यटकांकडून रेव्ह पार्ट्यांच्या वेळी एल्एस्डी या अमली पदार्थासह कोकेन, चरस आणि गांजा या अमली पदार्थांची विक्री केली जाते.