ब्रह्मीभूत सद्गुरु रामचंद्र महाराज यादव यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पालखी मिरवणूक श्री विठ्ठलाच्या गजरात भावपूर्ण वातावरणात पार पडली !

ब्रह्मीभूत सद्गुरु रामचंद्र महाराज यादव यांच्या पुण्यस्मरणाच्या निघालेल्या दिंडीच्या प्रसंगी मान्यवर

कोल्हापूर – ब्रह्मीभूत सद्गुरु रामचंद्र महाराज यादव यांच्या ४८ व्या पुण्यस्मरण, तसेच वैकुंठवासी श्रीगुरु भानुदास महाराज यादव यांच्या चतुर्थ पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने ४ मे या दिवशी पालखी मिरवणूक आणि दिंडी काढण्यात आली. साकोली कॉर्नर येथील ‘श्री ज्ञानदेव सदन’ येथून निघालेली ही दिंडी श्री महालक्ष्मीदेवी मंदिर, भवानी मंडपमार्गे परत ‘श्री ज्ञानदेव सदन’ येथे आली. पालखीत ब्रह्मीभूत सद्गुरु रामचंद्र महाराज यादव यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. ‘रामकृष्ण हरि’च्या गजरात आणि संतांचे अभंग म्हणत जाणार्‍या शिस्तबद्ध मिरवणुकीने कोल्हापूरकरांचे मन जिंकले.

ब्रह्मीभूत सद्गुरु रामचंद्र महाराज यादव यांच्या पुण्यस्मरणाच्या निघालेल्या दिंडीच्या प्रसंगी ह.भ.प. महादेव यादव महाराज आणि बालचमू

मिरवणुकीत अगदी २ वर्षांच्या लहान मुलापासून ९० वर्षांपर्यंतचे भाविकही सहभागी झाले होते. भगव्या पताका, महिलांनी डोक्यावर घेतलेले तुळशी वृंदावन, भगवे ध्वज, टाळ-मृदंगाचा नाद यांमुळे कोल्हापूर शहर वारकरीमय होऊन गेले होते. या प्रसंगी ह.भ.प. महादेव यादव महाराज, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज यादव, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज यादव, भाजपचे माजी नगरसेवक श्री. अजित ठाणेकर यांसह विविध मान्यवर सहभागी झाले होते. दिंडी झाल्यावर महाप्रसाद झाला.