महापालिकेने गृहनिर्माण संस्थेला पाठवले वर्षभराचे २४ लाख रुपयांच्या पाणीपट्टीचे देयक !

महापालिकेचा मनमानी कारभार !

पुणे – महापालिकेने बावधन येथील एका गृहनिर्माण संस्थेला (सोसायटीला) २४ लाख रुपयांच्या पाणीपट्टीचे देयक पाठवले आहे. मीटरचे रिडिंग घेण्यासाठी कर्मचारी न्यून असल्याने प्रत्येकी २ महिन्यांनी देयक पाठवणे आवश्यक असतांना गृहनिर्माण संस्थेला वर्षभराचे देयक एकाच वेळी पाठवले. (देयक नियमित का पाठवले नाही ? त्यावर उपाययोजना का काढली नाही ? – संपादक)

प्रतिकात्मक छायाचित्र

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात आतापर्यंत व्यावसायिक आणि निवासी असे एकूण १ लाख ८० सहस्र पाण्याचे मीटर बसवले आहेत. याने पाण्याचा अचूक वापर नोंदवला जात आहे. अनेक गृहनिर्माण संस्था त्यांच्या संमत कोट्यापेक्षा जादा पाणी वापरत असल्याचे लक्षात आले आहे. बावधन येथील डी.एस्.के. रानवारा या गृहनिर्माण संस्थेत ५०० हून अधिक सदनिका, दुकाने असून महापालिकेने २ निवासी आणि १ व्यावसायिक नळजोड दिला आहे. नियमित पाणीपट्टी भरत असून वर्षभर देयक आले नाही. २४ लाख रुपयांचे देयक कसे भरणार ? महापालिकेने सवलत द्यावी, असे गृहनिर्माण संस्थेच्या सचिव माधुरी देशपांडे यांनी सांगितले. पाणीदेयकात सवलत अधिकार नसल्याचे अधीक्षक अभियंता प्रसन्नराघव जोशी यांनी सांगून महापालिकेत एकूण मीटर रीडरच्या ८३ जागांपैकी ५९ रिक्त असल्याचे ते म्हणाले.