Eliminate Jihadi Terrorists : पाकिस्तानसह भारतातील जिहादी आतंकवाद्यांचा खात्मा करा ! – संतप्त हिंदूंची केंद्र सरकारकडे मागणी

पहलगाम आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ चिपळूण येथे मोर्चा

चिपळूण, ५ मे (वार्ता.) – पहलगाम, काश्मीर येथे २६ हिंदु पर्यटक यांना त्यांचा धर्म विचारून जिहादी आतंकवाद्यांनी ठार मारले, तसेच पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबादमध्ये हिंदूंच्या हत्या केल्या जात असून त्यांना स्वतःचीच गावे सोडून विस्थापित जीवन जगावे लागत आहे, या संतापजनक घटनांचा निषेध करण्यासाठी चिपळूण येथे भव्य निषेध मोर्चाचे आयोजन सकल हिंदु समाजाच्या वतीने करण्यात आले.

‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘भारतात पाकिस्तानी जिहादी आतंकवाद्यांना मदत करणार्‍यांचा निषेध, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. हिंदूंच्या मनात असलेल्या या घटनांचा संताप या ‘घोषणां’द्वारे व्यक्त होत होता.

येथील वेस मारुति मंदिर येथून हा मोर्चा आरंभ होऊन बाजारपेठमार्गे चिपळूण पोलीस ठाण्याजवळ विसर्जित करण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने हिंदूंच्या विविध संघटना, संप्रदाय, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम मोर्च्यात सहभागी झाले होते. मोर्च्याच्या शेवटी कु. हर्षाताई ठाकूर यांनी मोर्च्याला संबोधित केले. शेवटी प्रांताधिकारी कार्यालयात सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.