मंत्री भरत गोगावले यांची माहिती !
आळंदी (जिल्हा पुणे) – येथे चालू असलेल्या संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि ‘शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेने’च्या माध्यमातून राज्यभर विनामूल्य ‘ज्ञानेश्वरी’चे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. घरात बसणार्यांपेक्षा हिंदुत्वाचा विचार घेऊन जनतेत उतरलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यासमवेत जाणे, हेच योग्य ठरते. त्यांचे संतविचारांवर निष्ठा आणि वारकर्यांप्रती प्रेम आहे, असे मंत्री गोगावले यांनी सांगितले.

राज्य सरकारकडून एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आळंदी पारायण सोहळ्यासाठी २ कोटी रुपयांचा विशेष निधी देण्यात आला असून रायगडसारख्या शिवस्मारकांनाही वारकर्यांनी दर्शनासाठी अवश्य भेट द्यावी, असेही आवाहन मंत्री गोगावले यांनी केले. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अक्षय महाराज भोसले पूर्णवेळ समन्वयक म्हणून आळंदी येथे उपस्थित आहेत.