अ‍ॅमेझॉनकडून अंतवस्त्रे आणि पायपुसण्या यांवर श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजाचे चित्र !

  • श्रीलंकेकडून उत्पादने त्वरित हटवण्याचा अ‍ॅमेझॉनला आदेश !

  • चिनी आस्थापनाकडून या साहित्याचे उत्पादन !

  • अ‍ॅमेझॉन हा सराईत गुन्हेगाराप्रमाणे भारतासह विविध देशांची राष्ट्र आणि धर्म यांची प्रतीके असणार्‍या चिन्हांचा जाणीवपूर्वक अवमान करून त्यांचे मूल्य न्यून करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे !
  • श्रीलंका चीनकडून घेतलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाखाली दबला आहे. हे लक्षात घेऊन श्रीलंकेचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या वस्तूंची चिनी आस्थापना जाणीवपूर्वक या देशाला हिणवण्यासाठी निर्मिती करत आहे आणि चीन सरकारचीही त्याला साथ आहे, हे लक्षात घ्या !
  • अ‍ॅमेझॉन आणि चीन यांच्याकडून भारताच्या संदर्भात अशी कृती होऊ नये, यासाठी भारताने आतापासून आक्रमक पवित्रा घेणे आवश्यक !

कोलंबो (श्रीलंका) – ऑनलाईन साहित्य विक्री करणार्‍या अ‍ॅमेझॉनकडून महिला आणि पुरुष यांची अंतवस्त्रे, पायपुसण्या यांची विक्री करतांना त्यावर श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजाचे चित्र प्रसिद्ध केल्याने श्रीलंकेने ही उत्पादने तात्काळ हटवण्यास सांगितले आहे. या साहित्याचे उत्पादन चिनी आस्थापनाकडून होत आहे. त्यामुळे श्रीलंकेने चीन सरकारकडेही हे सूत्र उपस्थित केले आहे. वॉशिंग्टन येथील श्रीलंकेच्या दूतावासाने अमेरिकेच्या सरकारकडेही याची तक्रार केली आहे.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. –  संपादक)

या संदर्भात श्रीलंकेतील काही लोकांनी सामाजिक माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एकाने लिहिले आहे, ‘अशा घटनांतून चीन श्रीलंकेकडे कोणत्या दृष्टीने पहातो, हे लक्षात येते.’ दुसर्‍याने लिहिले आहे की, जर आपण (श्रीलंकेने) चीनचे कर्ज चुकवले नाही, तर तो आपल्या राष्ट्रीय ध्वजाला टॉयलेट पेपरवरही प्रसिद्ध करू शकतो.