५० लाखाचा मुद्देमाल हस्तगत ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
सातारा – गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करणार्या ट्रकवर नीरा नदीच्या काठी राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईमध्ये मद्याची ४८० खोकी आणि ट्रक असा अनुमाने ५० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गोवा राज्यात अनुमती असलेल्या मद्याचा ट्रक गोवा येथून सातारा-नगर मार्गे गुजरातकडे जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार सातारा-नगर रस्त्यावरील नदीकाठी असलेल्या पालखी तळासमोर सापळा रचत संशयित ट्रकचालकाला थांबवण्यात आले. ट्रकची पडताळणी केली असता मागील बाजूस २०० लीटर क्षमतेचे रिकामे लोखंडी बॅरल असल्याचे दिसून आले; मात्र बॅरलच्या मागे विविध आस्थापनांचे ४८० खोकी मद्य असल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना कह्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र मद्य बंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.