कर्नाटकने अवैधरित्या म्हादईचा जलप्रवाह वळवला आणि कळसा पात्राचे पाणी पहिल्यांदाच सुकले !

पणजी, १ मार्च (वार्ता.) – म्हादई जलवाटप तंटा लवाद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे प्रविष्ट असतांनाही कर्नाटक राज्य अनधिकृतपणे म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवणे चालूच ठेवत असल्याचे उघड झाले आहे. कर्नाटकच्या या कृतीमुळे म्हादईच्या प्रारंभी कणकुंबी (कर्नाटक) येथील कळसा पात्राचे पाणी प्रथमच सुकले आहे. कर्नाटक येथे म्हादईचा आरंभ होत असलेल्या ठिकाणी भौगोलिक आणि भूगर्भीय पालट करण्यात आल्याने याचा मोठा फटका गोव्यातील म्हादईच्या प्रवाहाला बसणार असल्याचे पर्यावरणतज्ञांचे म्हणणे आहे. याविषयी ‘प्रूडंट मिडिया’ने एक विशेष वृत्त प्रसिद्ध केले आहे.

या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकने कळसा पात्रात मातीचा भराव घालून या पात्रात पाणी वहाण्यास प्रतिबंध केला आहे, तसेच हे पाणी बंधारा घालून कर्नाटकच्या बाजूने वळवले आहे. पूर्वी कळसा पात्रात पाणी वाहून ते गोव्याच्या दिशेने जात होते. याविषयी पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर म्हणाले, ‘‘इतिहासात प्रथमच कळसा पात्राचे पाणी सुकले आहे. यामुळे जलस्रोतावर विपरीत परिणाम झाला आहे. याचे गोव्याला गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत.’’ सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली एक समिती नुकतीच गोव्यात येऊन तिने म्हादईच्या पाण्यातील खारटपणाच्या पडताळणीसाठी नमुने घेतले आहेत.