भारतमातेच्या मुक्तीयज्ञात सर्वस्वाची आहुती देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर !

२६ फेब्रुवारी २०२१ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतीदिन (दिनांकानुसार) आहे. यानिमित्ताने…

१. मातृभूमीच्या स्वातंत्र्यास्तव आरंभलेल्या अखंड प्राणयज्ञात जीवनाची अव्याहत आहुती देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !

‘स्वातंत्र्यवीर श्री. विनायक दामोदर उपाख्य तात्या सावरकर म्हणजे मातृभूमीच्या स्वातंत्र्यास्तव केलेला एक अखंड प्राण-यज्ञ ! जीवनाची एक अव्याहत आहुती ! त्यांनी या यज्ञाची सिद्धता छत्रपती शिवरायांप्रमाणे बालवयातच केली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही वयाच्या ८३ व्या वर्षांपर्यंत त्यांचा हा यज्ञ चालू होता. ‘अखंड भारत’ बघण्यासाठी अहोरात्र तळमळणारा, काळ्या पाण्याच्या नावाने प्रसिद्धी पावलेल्या नरकतुल्य अंदमान बेटात दोन जन्मठेपांच्या शिक्षा भोगत, अनेकानेक प्राणघातकी यातना, तसेच प्राणांतिक छळ भोगूनही जणू साक्षात मृत्यूचा सामना करत त्याला ही मागे सारीत, ‘मृत्युंजयी’ सिद्धी पावलेला हा स्वातंत्र्यवीर प्रायोपवेशन (आत्मसाक्षात्कार होण्याकरता एक मार्ग) करून स्वतःच मृत्यूला कवटाळता झाला.

२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी झालेली भेट हा जीवनातील एक अत्यंत आनंददायक आणि अविस्मरणीय ठेवा !

२ अ. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शिक्षण, वास्तव्य आदींविषयी आत्मियतेने विचारपूस करणे : अशा या मृत्यूंजयी स्वातंत्र्ययोद्ध्याला भेटण्याचे, त्यांच्याशी आपुलकीने बोलण्याचे परमभाग्य मला वर्ष १९४१ च्या मे मासाच्या शेवटी लाभले. त्यांचे परमभक्त आणि नागपूर येथे प्रकाशित होणारे ‘सावधान’ या साप्ताहिकाचे प्रमुख संपादक अन् संचालक श्री. रामचंद्र बालाजी उपाख्य आप्पाजी मावरकर (माझे सख्खे आजोबा) यांच्यासमवेत मी त्यांना भेटायला मुंबईला गेलो होतो. ती ‘स्वातंत्र्यविरांशी दादर सदनातील भेट’ हा माझ्या जीवनातील एक अत्यंत आनंददायक आणि अविस्मरणीय ठेवा ! मी त्यांच्या युगल चरणांवर माझे मस्तक परम भक्तीभावाने टेकवले. त्यांनी मला उठवून पोटाशी धरले आणि माझे शिक्षण, वास्तव्य आदींविषयी अत्यंत आत्मियतेने विचारपूस केली. माझ्या किशोरवयातच मी त्यांचे ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ वाचले होते. त्या भेटीत मावरकर यांनी त्यांना नागपूरला येण्याविषयी परम आग्रहही केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तितक्याच आपुलकीने मान्य केले.

२ आ. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी झालेल्या संवादाविषयी सांगणे : त्या वेळी त्यांच्याशी झालेल्या बोलण्यातून त्यांची भारताला स्वातंत्र्य मिळण्याविषयीची तळमळ लक्षात आली. त्यांनी सांगितले की, भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीने प्रारंभ झालेल्या द्वितीय महायुद्धाचा अवश्य लाभ घ्यायला हवा. आपल्याला अशी संधी पुन्हा मिळणार नाही. २२.६.१९४० या दिवशी मला भेटायला आलेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही मी या संधीचा लाभ घेण्याविषयी सुचवले आहे. मी सुभाषचंद्र बोस यांना सांगितले की, ‘इथे आंदोलन करून आणि त्यासाठी शिक्षा भोगत कारागृहात सडण्यापेक्षा तुम्ही भारताबाहेर पडून जर्मनी, जपान, इटली या इंग्रजांच्या शत्रू देशांशी ‘शत्रूचा शत्रू हा आपला मित्र ठरतो’, हे लक्षात घेऊन हातमिळवणी करा. त्यांच्या साहाय्याने भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी बाहेरून युद्ध छेडा. या दृष्टीने प्रसिद्ध क्रांतीकारक रासबिहारी बोस जपानच्या साहाय्याने आझाद हिंद सेनेची जमवाजमव करत भारताच्या पूर्व दिशेकडून त्याच्या स्वातंत्र्यास्तव सिद्धतेला लागले आहेत. त्यांना त्वरित भेटण्याच्या दृष्टीने सिद्धता करा. हे बघा, त्यांचे नुकतेच मिळालेले पत्र.’ नंतर ते आम्हाला म्हणाले, ‘‘ते पत्र वाचून सुभाषबाबू त्या दृष्टीने सिद्धता करत आहेत. आपण सर्वांनीही त्यांना साहाय्य करण्यासाठी तत्पर रहायला हवे.’’

३. सुभाषचंद्र बोस यांचे जर्मनी येथे पलायन

या लेखात हा गौप्यस्फोट करायला काहीच प्रत्यवाय नसावा. रा.स्व. संघाचे स्वयंसेवक आणि सुकामेवा अन् फळे यांचे व्यापारी श्री. उत्तमचंद्र मल्होत्रा यांनी सुभाषचंद्र बोस यांना कोलकाता येथील त्यांच्या रहात्या घरातून, त्यांच्यावर लादलेल्या सरकारी नजरबंदीतून सोडवले आणि झियाउद्दीन पठाणाच्या वेशात पेशावरमार्गे काबूल येथे पोचवले. नंतर श्री. उत्तमचंद्र मल्होत्रा यांनी काबूल येथील त्यांचे मित्र इटालियन राजदूतांच्या साहाय्याने इटालियन विमानाने सुभाषचंद्र बोस यांना रशियामार्गे जर्मनीला हिटलरकडे ‘भारताच्या स्वातंत्र्यासाठी साहाय्य मिळावे’, यासाठी पाठवण्याचे ठरले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे रा.स्व. संघाच्या ज्येष्ठ-श्रेष्ठ कार्यकर्त्यांना (उत्तरप्रदेश प्रांतप्रचारक मा. श्री. मुरलीधर दत्तात्रय उपाख्य भाऊराव देवरस सुभाषबाबूंचे निकटस्थ चाहते होते) संदेश लाभले होते. भाऊरावांनी त्याप्रमाणे मला आणि वेशभूषा अन् मानवमुद्रा यांच्या श्रृंगारात पालट करण्यात पटाईत असलेले (मेकअपमॅन) श्री. बाबूराव मोघे, उत्तरप्रदेश संघ विभाग प्रचारक आणि पंजाब प्रांत संघ प्रचारक श्री. राजाभाऊ पातुरकर यांना ‘सुभाषबाबू मुक्ती योजने’त सामावून घेतले होते.

मी सुभाषबाबूंचा चाहता आणि बनारस येथील असल्याने माझ्याकडे तीर्थक्षेत्री असलेल्या काशीच्या पंड्याची भूमिका देण्यात आली होती. ‘काशीविश्‍वेश्‍वराच्या पेढे-बर्फीच्या प्रसादात भरपूर भांग मिसळून सुभाषबाबूंवर डोळ्यांत तेल घालून दृष्टी ठेवणारे गुप्तचर अन् पहारेकरी यांना भांगमिश्रित प्रसाद वाटून त्यांना बेशुद्ध करायचे. त्यामुळे सुभाषबाबू निर्विघ्नपणे पठाणाच्या वेशात मध्यरात्रीच्या सुमारास घराबाहेर पडू शकतील आणि भारताबाहेर पडून शत्रूंच्या शत्रूशी हात मिळवणी करतील अन् भारताच्या स्वातंत्र्यास्तव प्रयत्न करू शकतील’, अशी योजना होती. ही योजना इंग्रज सरकारच्या हातावरी तुरी देऊन यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. १७.१.१९४१ या दिवशी ही घटना घडली.

४. सुभाषचंद्र बोस आणि नाविक बंड यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य देत असल्याविषयी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी संसदेत सांगणे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुभाषबाबूंना भारताबाहेर पडून इंग्रजांच्या शत्रूंशी हातमिळवणी करून भारताच्या स्वातंत्र्यास्तव प्रेरित केले. जर त्यांनी तसे केले नसते आणि सुभाषबाबूंची आझाद हिंद सेना प्रत्येक स्तरावर विजय प्राप्त करत विजयपथावर आरूढ नसती, तर इंग्रज सरकार भारताला १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी स्वातंत्र्य प्रदान करण्यास्तव बद्ध झालेच नसते. हेही तितकेच खरे आहे. हे वास्तव धरून चालण्यास काहीच हरकत नसावी.

ब्रिटनचे प्रधानमंत्री सर क्लेमेंट एटली यांनी ‘ब्रिटीश हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये चर्चा करतांना सांगितले, ‘‘भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मोहनदास गांधी आणि काँग्रेस पक्ष यांचेच नाव घेतले जात असले, तरी सुभाषचंद्र बोस यांच्या ‘आय.एम.ए.’ आणि त्यानंतर झालेल्या ‘नेव्हल रिव्होल्ट’ (नाविकांचे बंड) अन् त्यामुळे निर्माण झालेल्या जनआक्रोशामुळे आम्हा ब्रिटिशांना भारताला मुक्त करणे भाग पडले.’’ ब्रिटीश सरकार सुभाषचंद्रांमुळे नमले. गांधींच्या चळवळीमुळे नाहीच.

५. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची उत्कट राष्ट्रभक्ती !

अ. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शारीरिक कष्ट, कौटुंबिक यातना, उपेक्षा, अवहेलना सोसणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची राष्ट्रभक्ती एवढी उत्कट होती की, राष्ट्रदेवतेच्या उपासनेविना त्यांच्या जीवनाला दुसर्‍या कोणत्याच हेतूने स्पर्श केला नव्हता. त्यांची राष्ट्रभक्ती केवळ काव्यातील शब्दांत फुललेली नव्हती, तर वास्तवातील शारीरिक कष्ट, कौटुंबिक यातना, उपेक्षा, अवहेलना याचा अंगार त्यांनी अतीभयंकर रूपात झेलला होता.

आ. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याविषयी पश्‍चात्ताप न होणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘स्वातंत्र्योत्तर काळात गांधी यांच्या हत्येशी जोडलेला निर्घृण कारावास आणि अशा सर्वच अनाठायी ठरलेल्या अपेक्षांना सहन करत, या माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, भारतमातेच्या मुक्ततेसाठी मी माझे सर्वस्व पणाला लावून त्यासाठी लढलोच का ?’, असा प्रश्‍न कधी मनातही येऊ दिला नाही. त्यांना याचा यत्किंचितही पश्‍चात्ताप वाटला नाही. याउलट ते सतत हेच म्हणत होतेे, ‘‘ईश्‍वर माझ्या या बांधवांना त्यांची माझ्याविषयीची गैरवर्तवणूक दुर्लक्षित करत सदैव क्षमा करो.’’

६. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात काँग्रेस, डावे पक्ष आणि विरोधक यांचे ‘विरोधासाठी विरोध’, हेच धोरण असणे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन समजून घ्यायचे असल्यास त्यांच्या पुढे नम्र व्हावे लागते किंवा त्यांना समजून घेण्याची उंची तरी गाठावी लागेल. काँग्रेस, डावे पक्ष आणि त्यांचे विरोधक यांनी असे करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. ‘विरोधासाठी विरोध’, हेच यांचे ‘आदत से मजबूर’ या हिंदी उक्तीप्रमाणे सदैव धोरण होते. अशा लाचारांजवळ अभिजात मोठेपणा, त्यांचे महान कार्य, उच्चतम राष्ट्रभक्ती यांचा सन्मान राखण्याचा, सुसंस्कृतपणाचा, ना मनाच्या मोठेपणाचा भाव असतो. असतो तो केवळ अभाव असतो. तेवढी उंची गाठण्याची त्यांची लायकीच विलोपित झालेली असते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे दुरान्वये का होईना, या आमच्या हिंदुस्थान देशाला स्वातंत्र्य लाभले. त्याच देशात काँग्रेसच्या राजवटीत ते उपेक्षित ठरले. हे या भारताचे नि भारतमातेचे भयंकर दुर्दैवच म्हणायचे.

देश आणि राष्ट्र यांच्याप्रती भक्ती तीव्रतम प्रेरणा देणारी ! अशा या स्वातंत्र्यवीराचे गुणगान करावे तेवढे अल्पच ! हिंदुत्वनिष्ठ आणि देशनिष्ठ या सर्वांकडून त्यांना या प्रेरणादिनी शतशः प्रणाम आणि परम आदरपूर्वक भावपूर्ण पुष्पांजली अर्पण !’

– श्री. वसंत अण्णाजी वैद्य, नागपूर

(संदर्भ : मासिक ‘धनुर्धारी’, मे २००७)