‘मी प्रतिदिन एका मंदिरात नागदेवतेच्या दर्शनासाठी जाते. तेव्हा तेथील मंदिर व्यवस्थापनाचे आणि पुजार्यांचे त्या मंदिराकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष पुढील स्थितीवरून लक्षात आले.
१. गोल घुमटाकृती कळस आणि त्याला दिलेला रंग पाहिल्यावर मशिदीची आठवण येणे
मंदिरावर असलेल्या गोल घुमटाकृती कळसाला चकाकणारा चंदेरी, हिरवा आणि केशरी रंग दिला आहे. त्यामुळे त्या कळसाकडे पाहिल्यावर मशिदीची आठवण येते.
(‘मंदिरात जातांना प्रथम कळसाचे दर्शन घ्यायचे असते. जर कळसाकडे पाहून मशिदीची आठवण येत असेल, तर भक्तांना कोणती स्पंदने मिळणार ? हिंदु राष्ट्रात कळस अशा प्रकारे बनवले जातील की, केवळ लांबून पाहूनही ते मंदिर कोणत्या देवतेचे आहे ? याची भक्तांना अनुभूती येऊ शकेल.’ – संकलक)
२. मंदिराची नियमित स्वच्छता होत नसल्याने धूळ आणि फरशीवर तेलाचे असंख्य डाग दिसणे
त्या मंदिरात नागदेवतेच्या आजूबाजूला पणत्या अस्ताव्यस्त पडल्या आहेत. भिंतीवर तेलाचे ओघळ दिसतात आणि फरशीवरही तेलाचे मोठ्या आकाराचे पुष्कळ डाग आहेत. त्या स्थानाला प्रदक्षिणा घालतांना आजूबाजूला असंख्य लहान-मोठे दगड आहेत. त्यामुळे प्रदक्षिणा घालतांना पायाला खडे बोचतात. तसेच त्याच्या मागे असलेल्या भिंतीवर नागाची छोटी पितळी प्रतिमा धूळ खात पडलेली आहे. या स्थितीवरून त्या ठिकाणची नियमित स्वच्छताही केली जात नसल्याचे निदर्शनास आले.
(आपण ज्या घरात रहातो, ते प्रतिदिन स्वच्छ ठेवतो. अस्वच्छ घरात रहायला आपल्याला तरी आवडेल का ? त्याचप्रमाणे देवतेच्या मंदिराच्या स्वच्छतेसंदर्भात अशी उदासीनता ठेवल्यास देवतांचे तरी तिथे वास्तव्य राहिल का ? – संकलक)
३. दगडी नागाच्या फण्यांवरील डोळे अस्पष्ट होणे
तेथे नागाच्या ३ दगडी प्रतिमा आहेत. त्या नागाच्या फण्यांवरील डोळेही नीट दिसत नाहीत. ३ नागांच्या एकूण ६ डोळ्यांपैकी केवळ दोन नागांच्या फण्यावरील प्रत्येकी एकच डोळा दिसतो. त्या तिन्ही फण्यांवर हळदी-कुंकवाचे डाग पडलेले आहेत.
(देवतांचा जिवंतपणा त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहिल्यावर अधिक प्रमाणात जाणवतो. त्यामुळे देवतांच्या डोळ्यांकडे पाहून भक्तांचा भाव जागृत होतो; पण इथे नागदेवतेचे डोळेच अस्पष्ट झाले असतील, तर त्या प्रतिमेकडे पाहून भक्तांचा भाव जागृत कसा होणार ? दगडी प्रतिमेचे डोळे काही वर्षांनी बुजल्यानंतर मूर्तीचे पुन्हा कोरीव काम करून नागदेवतेत जिवंतपणा आणायला हवा, हे मंदिर व्यवस्थापन आणि पुजार्यांना कळत कसे नाही ? – संकलक)
४. मंदिराच्या भोवती असलेल्या स्टीलच्या संरक्षक खांबांवर मळकट कपडे वाळत घालणे आणि त्याचे पाणी नागदेवतेच्या फरशीवर पडणे
एक दिवशी मी दर्शनाला गेल्यावर पाहिले, तर त्या मंदिराच्या भोवती असलेल्या स्टीलच्या संरक्षक खांबांवर तेथील पुजार्यांनी अर्धी चड्डी, बनियन आणि जणू काही तेल पुसल्याप्रमाणे अत्यंत मळकट झालेला पंचा वाळत घातले होते आणि त्यांचे पाणी नागदेवतेच्या फरशीवर पडत होते. ते पाहून मला किळस वाटून अतिशय अस्वस्थ वाटू लागले.
(मंदिराचे खांब म्हणजे अंतर्वस्त्रे वाळत घालण्याची जागा आहे का ? – संकलक)
५. नागाच्या प्रतिमा न पुसता केवळ निर्माल्य काढून नवीन फुले वहाणे
थोड्या वेळाने पुजारी आले आणि त्यांनी नागाच्या प्रतिमा न पुसता केवळ निर्माल्य काढून नवीन फुले वाहिली. अशा स्थितीमध्ये ‘तिथे नागदेवतेचे अस्तित्व कसे असेल ?’, असा विचार माझ्या मनात आला.
६. पुजार्यांनी नागदेवतेला वाहिलेले निर्माल्य न काढताच मंत्र म्हणणे
एक दिवशी मी मंदिरात गेले, तेव्हा एक पुजारी नागदेवतेसमोर उभे राहून मंत्र म्हणत होते. ते गेल्यानंतर मी पाहिले, तर नागदेवतेवर वाहिलेले निर्माल्य तसेच होते. ते न काढताच पुजार्यांनी मंत्र म्हटले होते. ते पाहून मला वाटले की, मंत्र एका पुजार्यांनी म्हणायचे आणि निर्माल्य दुसर्या पुजार्यांनी काढायचे, असे त्यांनी आपापसांत वाटून घेतले आहे कि काय ?
(देवतेची पूजा न करता केवळ मंत्र म्हटले, तर देवतेचे तत्त्व जागृत कसे होणार ? त्याचप्रमाणे मंत्र न म्हणता केवळ निर्माल्य काढून नवीन फुले वाहिली, तरी देवतेचे तत्त्व जागृत कसे होणार ? आणि भक्तांनाही त्याचा लाभ काय होणार ? देवतेचे तत्त्व जागृत होण्यासाठी देवतेची मंत्रासहित भावपूर्ण पूजा होणे आवश्यक असते. – संकलक)
हे सर्व प्रसंग मी उत्तरदायी साधकांना सांगून विचारले, ‘‘मंदिर व्यवस्थापनाची अनुमती काढून तेथील स्वच्छता आपण करायची
का ?’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘मंदिराची स्वच्छता राखणे, हे मंदिर व्यवस्थापनाचे कर्तव्य असल्याने आपण स्वच्छता न करता दैनिक सनातन प्रभातमध्ये लेख लिहून जनजागृती करू. त्यामुळे त्याच मंदिरात नाही, तर इतर मंदिरांतही प्रतिदिन स्वच्छता केली जाईल.’’
– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.२.२०१९)
सनातन संस्थेची ‘मंदिर पावित्र्य रक्षण मोहीम’ साधकांना सूचना आणि वाचक अन् धर्माभिमानी यांना विनंती !या लेखात दिल्याप्रमाणे अनेक मंदिरांची दुरवस्था असते. त्याचा तेथील पावित्र्यावर परिणाम होतो. आपल्यालाही तीर्थक्षेत्री अथवा अन्य मंदिरांत असे काही चांगले किंवा वाईट अनुभव आले असतील, तर त्यासंदर्भातील माहिती सनातन प्रभातला कळवा आणि सनातन संस्थेच्या ‘मंदिर पावित्र्य रक्षण मोहीमे’त सहभागी व्हा ! धर्मजागृतीसाठी आणि हिंदूंचे प्रबोधन करण्यासाठी त्या अनुभवांचा उपयोग होईल. संपर्क : प्रा. महावीर श्रीश्रीमाळ पत्रव्यवहारासाठी पत्ता : २४/बी, सनातन आश्रम, पोस्ट बॉक्स क्र. ४६, रामनाथी, फोंडा, गोवा. ई-मेल : [email protected] संपर्क क्रमांक : (०८३२) २३१२६६४ |