आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांनी अती चिंता किंवा अती चिंतन टाळावे !

पू. संदीप आळशी

‘मध्यम ते तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर त्रासाचा अल्प ते अधिक प्रमाणात पगडा असतो. त्यामुळे त्यांच्याकडून साधनेचे प्रयत्न परिपूर्ण होण्यात थोड्या मर्यादा येतात. आध्यात्मिक त्रास असणारे काही साधक साधनेच्या प्रयत्नांच्या संदर्भात अती चिंता किंवा अती चिंतन करतात. अती चिंता करण्यामुळे अनावश्यक विचार किंवा ताण वाढून आध्यात्मिक त्रासात वाढ होते. अती चिंतन करण्यामुळे बौद्धिक गोंधळ किंवा न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ शकते. यासाठी अशा साधकांनी ‘साधनेच्या प्रयत्नांच्या संदर्भात किंवा स्वतःला प्रतिकूल वाटणार्‍या प्रसंगांच्या संदर्भात अती चिंता किंवा अती चिंतन न करता साधनेच्या दृष्टीने आवश्यक तेवढे चिंतन करून आणि त्यातून शिकून साधना करत रहाणे’, हे अधिक योग्य आहे. अती चिंता किंवा अती चिंतन टाळण्यासाठी शक्य असेल, तर लगेच दायित्व असलेल्या साधकाचे दिशादर्शन घ्यावे. परिणामी आपल्या मनाची ऊर्जा वाचते आणि योग्य दृष्टीकोनही शिकायला मिळतो.

‘आपल्याला साधनेतील सर्व परिपूर्णच जमले पाहिजे’, हा दुराग्रह बाळगू नये. ‘तीव्र स्वरूपातील एखादा स्वभावदोष किंवा अहंचा पैलू यांवर लवकर मात करता येत नाही’, याचा अर्थ ‘आपली साधनाच होत नाही’, असे नाही; कारण तो एकूण साधनेचा एक लहानसा भाग असतो. नामजप, सेवा, भावजागृतीचे प्रयत्न यांसारख्या अन्य प्रयत्नांनीही आपली साधना होतच असते. त्यामुळे ‘साधनेचे प्रयत्न परिपूर्णतेने जमत नाहीत’; म्हणून वाईट वाटून न घेता ‘ते परिपूर्ण जमण्यासाठी प्रयत्न करत रहाणे’, ही साधनाच आहे’, असा विचार करावा. पुढे आध्यात्मिक त्रास अल्प झाल्यावर सर्व प्रयत्न परिपूर्णतेने करायला जमतील.’

– (पू.) श्री. संदीप आळशी (१४.२.२०२१)