अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचे स्वरूप निश्‍चित करण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक पुन्हा घेण्यात येणार

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याचा परिणाम !

मुंबई – १ मार्चपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मुंबई येथे प्रारंभ होणार आहे. या अधिवेशनाच्या दिनदर्शिकेवर १८ फेब्रुवारी या दिवशी विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा झाली; मात्र राज्यात कोरोनाचा पुन्हा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन कामकाजाचाविषयी अंतिम निर्णय घेण्यासाठी २५ फेब्रुवारी या दिवशी विधीमंडळ कामकाज समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य विभागाचे सचिव राजेंद्र भागवत यांसह अन्य मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मंत्री आणि राज्यमंत्री यांसह केवळ एकाच अधिकार्‍याला प्रवेश :

अधिवेशनाच्या कालावधीत विधानभवनामध्ये खासगी व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार नाही. मंत्रालय अधिकारी आणि कर्मचारी यांनाही मर्यादित स्वरूपात, तर मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यासह केवळ एकाच अधिकार्‍याला प्रवेश देण्यात येणार आहे. सभागृहामध्ये विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी ‘यू.जी.’ यंत्रणा, ओझोन यंत्रणा, सॅनिटायझेशन कोटींग, प्रवेशद्वाराच्या ठिकाणी ‘थर्मल स्कॅनिंग’ यांसारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.