१ सहस्र ५५ कोटी रुपयांचा कर थकवला !
श्री. किशोरकुमार जगताप
मुंबई, १३ जुलै (वार्ता.) – वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात तब्बल ९ सहस्र ७३६ करचुकवे आढळले आहेत. वर्ष २०२१-२२ मधील थकलेल्या कराची रक्कम आणि वर्ष २०२२-२३ मधील थकबाकी मिळून करचुकव्यांनी महाराष्ट्र सरकारचा तब्बल १ सहस्र ५५ कोटी ६५ लाख रुपयांचा कर चुकवला. नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांनी सादर केलेल्या राज्य वित्तव्यवस्था लेखापरीक्षा अहवालामध्ये करचुकव्यांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यामध्ये वर्ष २०२२-२३ मध्ये २३८ जणांनी मूल्यवर्धित कर, विक्री कर आणि व्यापार कर चुकवला, तर ९ सहस्र ४९८ जणांनी मुद्रांक आणि नोंदणी शुल्क थकवले. वर्ष २०२१-२२ आणि २०२२-२३ मिळून विक्री, व्यापार आणि मूल्यवर्धित कर थकवणार्या ३५४ प्रकरणांमध्ये कर निर्धारित करण्यात आला आहे, तर मुद्रांक आणि नोंदणी शुल्क थकवणार्या ८ सहस्र ५१९ प्रकरणांत थकित कर निर्धारित करण्यात आला आहे.
सलग ४ वर्षे राज्याला महसुली तूट !
महाराष्ट्रात वर्ष २०१९ ते २०२३ या आर्थिक वर्षांत सलग ४ वेळा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये महसुली तूट आली. वर्ष २०२०-२१ मध्ये राज्याच्या महसूली तुटीची रक्कम ४१ सहस्र १४१ कोटी ८५ लाख रुपये इतकी होती. वर्ष २०२२-२३ मध्ये तुटीची रक्कम १ सहस्र ९३६ कोटी ४७ लाख रुपये इतकी उणावली आहे. वर्ष २०१८ ते २०२३ या सलग ५ वर्षांमध्ये राजकोषीय तूट आली.