किरण बेदी यांना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल पदावरून हटवले !

राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी आणि नायब राज्यपाल किरण बेदी

नवी देहली – तमिळनाडूच्या जवळील केंद्रशासित राज्य पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना पदावरून हटवण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बेदी यांच्या जागी तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन् यांच्याकडे पुदुच्चेरीच्या नायब राज्यपालपदाचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे.

१० फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ‘बेदी यांना परत बोलवून घ्यावे’, अशी विनंती केली होती. किरण बेदी यांचा कारभार तुघलकी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. बेदी यांना पदावरून हटवण्याआधीच पुदुच्चेरीमधील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे बेदी यांना पदावरून हटवण्यामागील नेमके कारण काय आहे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे. येत्या मे मासामध्ये पुदुच्चेरीमध्ये निवडणुका होणार आहेत.