सेवेची तळमळ असलेले आणि प्रेमभावाने इतरांशी जवळीक साधणारे श्री. अमित हडकोणकर अन् (सौ.) अदिती हडकोणकर  !

सेवेची तळमळ असलेले आणि प्रेमभावाने इतरांशी जवळीक साधणारे रामनाथी आश्रमातील श्री. अमित हडकोणकर अन् हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करणार्‍या अधिवक्त्या (सौ.) अदिती हडकोणकर  !

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करणार्‍या अधिवक्त्या (सौ.) अदिती हडकोणकर यांची देवद आश्रमातील साधकांनी वर्णिलेली गुणवैशिष्ट्ये !

श्री. अमित हडकोणकर अन् अधिवक्त्या (सौ.) अदिती हडकोणकर

१. देवद आश्रमात राहून दायित्व घेऊन सेवा करतांना वकिलीचे शिक्षणही पूर्ण करणे : वर्ष २०१३ मध्ये कु. अदिती देवद आश्रमात सुटीसाठी आली होती. तेव्हा तिने हळूहळू तेथील सेवा शिकून घेतल्या. सेवेची व्याप्ती पुष्कळ असूनही तिने सर्व सेवा सकारात्मक राहून शिकून घेतल्या. तिला सांगितले होते की, तू आश्रमात राहून सेवा आणि अभ्यास असे दोन्ही कर. तेव्हा तिने ते मनापासून स्वीकारले आणि आज्ञापालन केले. सेवा करत असतांनाच तिने वकिलीची परीक्षा दिली आणि वकिलीचे शिक्षणही पूर्ण केले.

२. विश्‍वासार्हता : अदितीला एकदा सेवा सांगितली की, ती पूर्ण होणारच, असा विश्‍वास असायचा. सेवेसाठी तिचा कधी पाठपुरावा घ्यावा लागत नसे.

३. तत्परता : तिला कधीही कोणतीही सेवा सांगितली, तरी ती कधीच सेवेला नाही न म्हणता नेहमी तत्परतेने करत असे.

४. झोकून देऊन सेवा करणे : ती देवद आश्रमात असतांना येथील साधकांचे व्यष्टी आढावे घेणे, ग्रंथ वितरण विभागातील सेवा कौशल्याने करणे, न्याहरी बनवण्याची सेवा करणे इत्यादी सर्व सेवा न दमता उत्साहाने करायची. सेवा करतांना तिने कधी स्वतःचा विचार केला नाही. तिच्या संगणकीय सेवा ती रात्री पूर्ण करत असे. कधी रात्री विलंबाने सेवेला बोलावले, तरी ती लगेच सेवेला येत असे. यातून तिच्यातील व्यापकता लक्षात येई. सर्वांनाच तिचा आधार वाटत असे. विभागातील सेवा पुढाकाराने करणे, विभागातील साधकांना समजून घेणे, त्यांना त्यांच्या चुका प्रेमाने सांगणे, असे दोन्ही ती सहजतेने सांभाळत असे.

५. तत्त्वनिष्ठता : व्यष्टी सेवेचा आढावा घेतांना ती तिच्याविषयीचा प्रसंग जरी साधकांनी सांगितला किंवा तिच्याविषयीची विचारप्रक्रिया सांगितली, तरी ती सर्व सहजतेने घेत असे. त्यांच्या विचारांचा तिच्या मनावर कधी परिणाम झाला नाही. यातून तिच्यातील तत्त्वनिष्ठता लक्षात येते.

६. प्रेमभाव

अ. अदिती तिच्या खोलीत रहाणार्‍या साधिकांना सहजतेने आणि पूर्णपणे आपलेसे करून घ्यायची. त्यांची काळजी घेणेे, कोणी आजारी असल्यास त्याला प्रेमाने प्रसाद आणि महाप्रसाद नेऊन देणे, सणांच्या दिवशी स्वतःकडे असलेले अलंकार प्रथम इतरांना वापरण्यासाठी देऊन नंतर स्वतःसाठी निवडणे, असे ती सहजतेने करायची.

आ. रामनाथी आश्रमात गेल्यावर ती आम्हाला विसरली नाही. देवद आश्रमात कोणी साधक येणार असतील, तर ती त्यांच्यासोबत आमच्यासाठी खाऊ पाठवते. अधूनमधून भ्रमणभाष करून ती सर्वांची विचारपूस करते. देवद आश्रमातील कोणी साधक रामनाथी आश्रमात गेले की, ती त्यांच्याशी आत्मीयतेने बोलते.

इ. अदिती आता कधी देवद आश्रमात आली, तर सर्वांना भेटतेे. आश्रमातील सर्वांना तिने आपलेसे करून घेतले आहे. आश्रमातील बरेच साधक तिची आठवण काढतात.

ई. अदिती पुष्कळ लाघवी असून नेहमी इतरांचा विचार करून त्यांना प्रेम देते. आध्यात्मिक त्रास होत असतांना मी कधी खोलीत झोपलेे असल्यास मला काही खायला पाहिजे असल्यास केवळ तिचाच आधार असायचा. ती प्रथम मला खायला आणून देऊन नंतर स्वतः घेत असे. मला ती माझी मैत्रीण आहे, असे वाटत असल्यामुळे मी तिच्याशी सहजतेने वागू शकते. – सौ. आनंदी पांगुळ

७. मायेची ओढ अल्प असणे : तिला मुळातच मायेची ओढ अल्प आहे. सुटीसाठी घरी गेल्यावर ती ४ – ५ दिवसच घरी थांबते. घरी गेल्यावर तिला आश्रमाचीच ओढ अधिक असते.

शुभेच्छा आणि प्रार्थना : चि.सौ.कां. अदितीला तिच्या आनंदी वैवाहिक जीवनासाठी देवद आश्रमातील सर्वांकडून मनःपूर्वक शुभेच्छा ! तिचे पुढील जीवन आध्यात्मिक उन्नतीचे अन् उत्कर्षाचे जावो, अशी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कोटीशः प्रार्थना !

– देवद आश्रमातील सेवेतील सहसाधक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.२.२०२१)

उत्तम नियोजनकौशल्य आणि सेवेची तळमळ असलेले रामनाथी आश्रमातील श्री. अमित हडकोणकर !

१. नियोजनकौशल्य : अमित त्याच्या प्रत्येक सेवेचे नियोजन अतिशय कुशलतेने करतो. त्यामुळे त्याच्याकडील सर्व सेवा वेळेत पूर्ण होतात. काही वेळेस तातडीने सेवा सांगितली, तरी ती सेवा तो कौशल्याने आणि अचूकतेने पूर्ण करतो. त्याचा विवाह निश्‍चित झाल्यावरही प्रथम त्याने त्याच्याकडील सर्व सेवा पूर्ण करायला प्राधान्य दिले अन् उरलेल्या वेळेत विवाहाची सिद्धता केली.

२. सेवेची तळमळ : अमितला एखादी सेवा सांगितली, तर तो ती पूर्ण करणारच, याची निश्‍चिती असते. काही सेवा तो एकहाती सांभाळतो. (एकट्याने करतो.) कोणतीही अडचण आली आणि अमितला विचारल्यावर ती सुटली नाही, असे कधी होत नाही.

३. व्यवस्थितपणा : अमितने केलेली प्रत्येक कृती व्यवस्थित असते. त्याचे सेवेचे पटल नेहमी व्यवस्थित आवरलेले असते. त्यामुळे त्या पटलाजवळ पुष्कळ चांगले वाटते.

४. तत्त्वनिष्ठता : सेवेतील त्रुटी किंवा अन्य अयोग्य कृती लक्षात आल्यास तो संबंधित साधकाला स्पष्टपणे सांगून साहाय्य करतो.

– देवद आश्रमातील सहसाधक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.२.२०२१)


संसाररूपी नावेतून गाठावे तू परमार्थासी ।
साधनेतून पालट घडण्या सत्वरी ।
देवाने केले अमितचे नियोजन भारी ॥ १ ॥

मितभाषी असूनही बोलावे लागतसे सर्वांशी ।
काया, वाचा अन् मनाने झाला तो एकरूप सेवेशी ॥ २ ॥

दायित्व घेऊनी सेवा करतसे भरभर ।
कितीही सेवा असली, तरी विचलित न होई क्षणभर ॥ ३ ॥

सेवेतील परिपूर्णता म्हणजे प्रगती ।
हे गुरुवचन त्याने नेले पूर्णत्वासी ॥ ४ ॥

देवाने विधीज्ञ दिले आता सोबती (टीप १) ।
संसाररूपी नावेतून गाठावे तू परमार्थासी ॥ ५ ॥

टीप १ : चि.सौ.कां. अदिती पवार या अधिवक्त्या आहेत.

– देवद आश्रमातील सहसाधक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.२.२०२१)


सौ. अदिती हडकोणकर यांची सहसाधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. अधिवक्त्या (सौ.) दुर्गा कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. इतरांना साहाय्य करणे : आश्रमातील, तसेच अन्य साधकांना अदिती तत्परतेने साहाय्य करते. मी दळणवळण बंदीच्या काळात घरी असतांना तिने मला सर्वतोपरी साहाय्य केले. आवश्यक त्या त्या सूचना, औषधे, तसेच नवीन ग्रंथ यांसंदर्भात कळवणेे, हे सर्व तिने तत्परतेने केले.

१ आ. ज्ञान वाढवण्याची तळमळ : विधी विभागातील सर्व सेवा शिकतांना, तसेच इंग्रजीचे ज्ञान वाढवण्याच्या दृष्टीने तिची तळमळ असते.

२. अधिवक्ता नीलेश सांगोलकर, पंढरपूर, सोलापूर.

२ अ. सकारात्मक : अदितीताई प्रत्येक सेवेसंदर्भात सकारात्मक असते, तसेच सेवा पूर्ण करण्याची जिद्दही ताईमध्ये जाणवते.

२ आ. तत्परता : अधिवक्ता अधिवेशनाच्या कालावधीत येणार्‍या सेवांतील सर्व बारीक-बारीक सूत्रे पूर्ण करण्यासाठी ताई प्रयत्नशील असते. ती संगणकीय सेवा करण्यासाठी सतत तत्पर असल्याचे अनेक वेळा अनुभवण्यास मिळाले आहे.

२ इ. तत्वनिष्ठता : आपल्या चुकीमुळे अथवा अन्य साधकांच्या स्वभावदोषांमुळे समष्टी सेवेची हानी व्हायला नको, या दृष्टीने समष्टी सेवा चांगली होण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे आणि सेवेकडे तत्त्वनिष्ठतेने पाहून ती पूर्ण करणे, हा भाग ताईच्या माध्यमातून शिकायला मिळाला.

२ ई. देवाला अपेक्षित अशी सेवा व्हावी, ही तळमळ : कोणत्याही सेवेकरता भ्रमणभाष केल्यास पुष्कळ व्यस्तता असली, तरी वेळ काढून सेवेविषयी बोलणे, त्याचसह सेवा कशी पूर्ण करून घेता येईल, यासाठी जिज्ञासेने प्रयत्न करणे, हाही भाग ताईकडून शिकायला मिळाला. ताई विधी विभागात वयाने आणि अनुभवाने लहान असूनसुद्धा देवाला अपेक्षित अशी न्यायालयीन सेवा साधना म्हणून व्हावी, यासाठीची तिची आंतरिक तळमळ अन् प्रयत्न पुष्कळ प्रमाणात जाणवतात. न्यायालयीन सेवेतील सूत्र कसे शिकायला मिळेल, स्वतःला तसे परिपूर्ण करता येईल, याकडेसुद्धा तिचा कल असतो.

३. अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, ठाणे.

३ अ. आनंदी आणि नम्र : अधिवक्ता अधिवेशनाच्या वेळेस अदितीताईची भेट होते. ताईचा तोंडवळा नेहमी आनंदी आणि हसरा असतो. तिच्या आवाजात नम्रता आणि प्रांजळपणा जाणवतो.

३ आ. इतरांचा विचार करणे : अधिवेशनाच्या सेवेत व्यस्त असतांनासुद्धा ती साधकांच्या अडचणी सोडवायला प्राधान्याने वेळ देते.

४. अधिवक्त्या प्रीती पाटील, सांगली

४ अ. हसतमुख : कितीही तातडीची आणि क्लिष्ट सेवा आली, तरी ताई नेहमी हसतमुख असते.

४ आ. इतरांना तत्परतेने साहाय्य करणे : आश्रमातून कोणतेही साहाय्य हवे असल्यास ताईला संपर्क केल्यानंतर तिच्याकडून लगेच साहाय्य मिळणार, याची निश्‍चिती असते. सेवा तत्परतेने पूर्ण करण्याचा ती प्रयत्न करते.

४ इ. इतरांची पुरेपूर काळजी घेणे : अधिवेशनानिमित्त आम्ही ज्या ज्या वेळी आश्रमात जातो, त्या त्या वेळी बाहेरून आलेल्या सर्व अधिवक्त्यांची ती काळजी घेते. निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, परतण्याचे नियोजन आदी सर्व व्यवस्थित झाले आहे ना ? इत्यादी बारीक बारीक गोष्टींची ती निश्‍चिती करून घेते.

प्रेमभावाने सर्वांचे मन जिंकणार्‍या, अल्प अहं आणि परात्पर गुरुदेवांप्रती भाव असणार्‍या रामनाथी, गोवा येथील सौ. अदिती हडकोणकर !

१. प्रेमभावाने जवळीक साधणे : जुलै २०१७ पासून कु. अदितीताई आणि मी एका सदनिकेत रहात होतो. पहिल्यापासून ती माझ्यावर पुष्कळ प्रेम करायची. तिने नवीन पोशाख शिवला किंवा दागिने घेतले, तर सगळ्यात अगोदर ती मला दाखवायची. मला तिची गंमत वाटायची; कारण तिच्या आणि माझ्या वयात बरेच अंतर आहे. ती म्हणायची, काकू, तुम्ही मला आईसारख्या आहात. एकदा एका दुकानात स्वस्त पोशाख मिळाले, असे सांगून तिने माझ्या मुलीसाठी पोशाख आणून दिले. स्वतःसाठी आणलेला खाऊ ती सर्वांना देत असे. जसे प्रेमाने जग जिंकता येते. तसे ती सर्वांची मने जिंकते. ती अडचणी समजून घेऊन उपाययोजना करत असेे.

२. स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी ठेवणे : ती नेहमीच साधकांशी आदराने आणि नम्रपणाने बोलते. ती रागावल्याचे, दुःखी असल्याचे किंवा निराश झाल्याचे मी कधी पाहिले नाही. ती स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी ठेवते.

३. नीटनेटकेपणा : तिला अव्यवस्थितपणा आवडत नाही. खोलीतील तिचा कप्पा नेहमी व्यवस्थित लावलेला असतो.

४. अधिवक्ता असूनही तिचा अहं अल्प आहे.

५. गुरुदेवांप्रती भाव असणे : गुरुदेवांप्रती तिच्या मनात पुष्कळ भाव आहे. त्यांच्याविषयीच्या सर्व गोष्टी ती लक्षपूर्वक ऐकते. त्या वेळी तिच्या तोंडवळ्यावर वेगळाच आनंद दिसून येतो.

अदितीताई, तुला विवाहाप्रीत्यर्थ शुभकामना ! असेच गुरुमाऊलीचे मन तुझ्या भक्तीभावाने जिंकत जा आणि लवकर लवकर गुरुमाऊलीच्या मनाशी एकरूप होण्याचा आनंद घे ! तुझ्या भक्तीभावाचा आनंद आम्हा सर्व साधकांनाही मिळू दे, अशी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !

गुरुमाऊलीने हे लिहून घेतल्यामुळे त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !

– श्रीमती मनीषा केळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.६.२०२०)

निरपेक्षपणे सेवा करणारे आणि शिस्तबद्ध अन् वक्तशीर असलेले श्री. अमित हडकोणकर !

१. दैनिक सनातन प्रभातच्या छपाईशी निगडित सेवा शिस्तबद्धरित्या आणि काटकसरीने करण्याचा प्रयत्न करणे : श्री. अमित हडकोणकर दैनिक सनातन प्रभातच्या छपाईशी निगडित सेवा करतो. छपाईसाठी लागणारा वेगवेगळा कागद खरेदी करण्याची प्रक्रिया करणे, छापलेल्या प्रती आणि कागद यांचा हिशोब जुळवणे आदी सेवाही तो करत असे. छपाई करतांना ती पहिल्या प्रतीपासून व्यवस्थित होत नाही. त्यामुळे काही प्रती वाया जातात. अशा किती प्रती वाया गेल्या ? एखादे दिवशी अधिक प्रती वाया गेल्या, तर छापखान्यात गेलेल्या साधकाला त्याविषयीचे कारण विचारणे, त्याचबरोबर छापखान्यातील कर्मचार्‍यांची काही चूक किंवा यंत्रातील बिघाड अशी कारणे असल्यास त्यांना सांगणे, असे तो न चुकता करत असे. कधीकधी रंगीत अंकांच्या छपाईच्या वेळी प्रतींची संख्या अल्प असायची. त्यामुळे एकूण प्रतींसाठी लागलेला कागद आणि वाया गेलेल्या प्रतींसाठी लागलेला कागद यांची टक्केवारी मर्यादेपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट असायची. त्यामुळे रंगीत अंक असेल, तेव्हा न्यूनतम किती छपाई केल्यास वरील वाया कागदाची टक्केवारी मर्यादेत राहील, हे सांगून तो तेवढे वितरण वाढवण्याविषयी सुचवायचा.

२. वक्तशीरपणा : अमित गेली २१ वर्षे सेवा करत आहेे. तो केवळ रविवारी सुट्टी घेतो आणि आठवड्यातील अन्य दिवस सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० किंवा ६ या वेळेत सेवा करतो. या वेळा तो कटाक्षाने पाळतो. सनातन प्रभातच्या कार्यालयापासून तो दूर रहातो; म्हणून त्याने कधी कार्यालयात येण्याची वेळ चुकवली आहे किंवा त्याच्या येण्यात अनियमितता आहे, असे झाले नाही. कार्यालयात आल्यावरही तो सेवेतील एकही क्षण वाया जाणार नाही, याविषयी सतर्क असतो.

३. प्रेमभाव : दैनिक सनातन प्रभातचे कार्यालय रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आहे. अमितची आश्रमातील अनेक साधकांशी जवळीक आहे. त्याची मातृभाषा कोंकणी असून शाळेत काही प्रमाणात त्याचे मराठीत शिक्षण झाले आहे. तो रहात असलेल्या भागातील समाज किंवा त्याचे मित्र, शालेय मित्र हे काही जण ख्रिस्ती आहेत. असे असूनही तो आश्रमातील अन्य राज्यांतील साधकांशी चांगल्यापैकी मराठीत संवाद साधतो.

४. मोकळेपणाने वागणे : आश्रमात गोमंतकीय पद्धतीचे जेवण नसते. त्यामुळे अमितला कधी गोमंतकीय पद्धतीचे खतखते, अळूच्या माडीची कापे, अळंबी आदी खावे वाटले, तर माझ्या पत्नीला (सौ. वृंदा मराठे यांना) तो मोकळेपणाने ते करायला सांगतो.

५. कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्तव्यकर्म म्हणून सेवारत रहाणे : मी आतापर्यंत अमितला पहात आलो आहे, त्याप्रमाणे तो त्याची सेवा निरपेक्षपणे करतो. त्या सेवेतून त्याला आत्मिक आनंद मिळत असणार; कारण त्याला अन्य कोणतीही अपेक्षा नसायची. साधकांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित झाली की, आपलीही व्हावी, ही अपेक्षा आम्हा साधकांच्या मनात असते; पण अमितच्या मनात असा कधी विचार आला असेल, असे मला जाणवले नाही. गुरूंची सेवा करायची आहे, आपले कर्तव्य चोख बजावायचे आहे, एवढेच त्याला ठाऊक आहे ! देवाला त्याची ही निरपेक्षता समजल्यामुळेच २ वर्षांपूर्वी त्याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले, असे मला वाटते.

श्री. वीरेंद्र मराठे

धर्मजागृती, हिंदूसंघटन अन् राष्ट्ररक्षण यांसाठी साधकांनी साधना म्हणून आर्थिक हानी सोसूनही चालवलेले एकमेव दैनिक ! ही टॅगलाईन सार्थ करणारा अमित ! : पूर्वी दैनिक सनातन प्रभातचे कार्यालय दोनापावला येथे होते. अमितच्या शिरदोन येथील घरापासून ते जवळ होते. त्यानंतर कार्यालय फोंडा तालुक्यात स्थलांतरित झाल्यावर तो शिरदोन येथून स्वतःच्या दुचाकीने फोंडा येथे येऊ लागला. त्याची घरची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती, असे नाही; पण तरीही दुचाकी गाडीच्या इंधनाचा खर्च गेली २० वर्षे तोच करत आहे. अमितसारखे असे त्यागी आणि निरपेक्ष वृत्तीचे साधक असल्यानेच दैनिक सनातन प्रभातच्या पहिल्या पानावर धर्मजागृती, हिंदूसंघटन अन् राष्ट्ररक्षण यांसाठी साधकांनी साधना म्हणून आर्थिक हानी सोसूनही चालवलेले एकमेव दैनिक ! ही वैशिष्ट्यपूर्ण ओळ (टॅगलाईन) छापणे शक्य होत आहे. दैनिक सनातन प्रभातला अन्य दैनिकांप्रमाणे प्रतिदिन मोठमोठी विज्ञापने मिळत नाहीत; पण दैनिक सनातन प्रभातकडे अमितसारखे दानशूर, त्यागी आणि निरपेक्ष वृत्तीचे साधक गेल्या २१ वर्षांपासून आहेत.

– श्री. वीरेंद्र मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.२.२०२१)

अमित, जीवनातील नव्या जोडीदारासह साधना करतांना व्हावे तू उन्मन ।

चि. अमित हडकोणकर आणि चि.सौ.कां. अदिती यांचे रामनाथी आश्रमात केळवण केले होते. त्या वेळी केलेले काव्य येथे देत आहे.

दैनिक सनातन प्रभातचा संपादकीय विभाग भरे नजरेत ठळक ।
पूर्णत्वास ते तेव्हाच जाईल, जेव्हा होईल छपाई अन् वितरण पूर्ण ॥ १ ॥

छपाई अन् वितरण यांची धुरा अमित समर्थपणे सांभाळत असे ।
कौटुंबिक दायित्व देवावर सोपवून तो पूर्णवेळ गुरुसेवा करे ।
वर्षानुवर्षे चिकाटीने अन् सातत्याने तो कार्यरत असे ।
जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतूनही त्यामुळेच तो मुक्त झाला असे ॥ २ ॥

शांत आणि एकाग्रतेने तो सेवेत मग्न राही ।
श्रीकृष्णासारख्या खट्याळ आणि खोडकर स्वभावाने ।
साधकांशी साधे जवळीकही ॥ ३ ॥

सेवेतील परिपूर्णता आणि सातत्य  ।
यातून जिंकले परात्पर गुरुदेवांचे मन ।
जीवनातील नव्या जोडीदारासह ।
साधना करतांना व्हावे तू उन्मन ॥ ४ ॥

नव्या कौटुंबिक जीवन प्रवासासाठी चि. अमित आणि चि.सौ.कां. अदिती यांना अनेकानेक शुभेच्छा !

– श्री. वीरेंद्र मराठे आणि कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.२.२०२१)

६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या फोंडा, गोवा येथील साधिका सौ. शकुंतला जोशी यांनी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. अमित हडकोणकर यांना विवाहाप्रीत्यर्थ दिलेले शुभेच्छापत्र ! 

सौ. शकुंतला जोशी

चि. अमित, तुम्ही सर्व जणांनी मला मुलासारखी माया दिली. त्यामुळे एका आईची आपल्या मुलाचे लग्न व्हावे, अशी व्यावहारिक इच्छा होती. तुझे लग्न ठरले, हे समजल्यावर तुझ्या आईला झाला असेल, तेवढाच अत्यानंद मलाही झाला.

१. इतरांना अत्यंत प्रेमाने साहाय्य करणे : तुझ्या साहाय्यानेच मी संगणक हाताळणी शिकण्यापासून सेवेपर्यंत सर्व करू शकले; कारण माझ्या अडचणी सोडवण्यासाठी तू सदैव तत्पर असतोस. अनेक वेळा मला साहाय्य करतांना तुझ्या सेवेत व्यत्यय यायचा; पण त्याविषयी तुला कधीच प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे तुला माझ्या अनेक अडचणी विचारतांना मला कधीच ताण आला नाही. यासाठी ईश्‍वरचरणी कृतज्ञता !

२. निरपेक्षतेने सेवा करणे : तुला साधिकाच पत्नी म्हणून लाभली, हे ईश्‍वरी नियोजन ! तुझ्या साधनेची काळजी ईश्‍वर घेणारच आहे; कारण तू निरपेक्ष भावाने सेवा करतोस, हे मी अनुभवले आहे. कुठलीही सेवा असो, आश्रमातील सेवा असो, साधकांची वैयक्तिक सेवा असो किंवा इतर कुठलीही सेवा निरपेक्षपणे कशी करावी ?, हे तुझ्याकडूनच शिकावे. तुझ्या अंगी उपजतच साधकत्व असल्याने तुला हे सहज जमू शकते.

गुरुकृपाशीर्वादाने सुयोग्य सहधर्मचारीणी संगे नेटका प्रपंच आणि नेटाने साधना करून तुमचे जीवन सार्थकी लागो, ही शरणागतभावाने गुरुचरणी प्रार्थना !

– सौ. शकुंतला जोशी, फोंडा, गोवा. (४.२.२०२१)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक