हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्याला संघर्ष करण्याची सिद्धता ठेवावी लागेल ! – आमदार टी. राजासिंह, भाग्यनगर

भाग्यनगर येथील धर्मजागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद 

आमदार श्री. टी. राजासिंह

भाग्यनगर (हैद्राबाद), १६ फेब्रुवारी (वार्ता.) – वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे; परंतु त्यासाठी आपल्याला संघर्ष करण्याची सिद्धता ठेवावी लागेल. हिंदु राष्ट्राची स्थापना होणार, हे मी किंवा मोदीजी सांगत नाही, तर संत सांगत आहेत. ही भविष्यवाणी खरी होणार आहे. त्यासाठी आपल्या मनात त्यागाची भावना जागृत ठेवावी लागेल. मी माझ्या घरासमोरच्या मैदानात प्रतिदिन ६०० युवकांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देत आहे. त्यात आपणही सहभागी व्हा, असे आवाहन येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. येथील बेगम बाजार भागामध्ये १३ फेब्रुवारी या दिवशी ‘धर्मजागृती सभे’चे आयोेजन करण्यात आले होते. या सभेला देहली येथील माजी आमदार श्री. कपिल मिश्रा आणि हिंदु जनजागृती समितीचे तेलंगाणा अन् आंध्रप्रदेश समन्वयक श्री. चेतन गाडी यांनीही संबोेधित केले.

रिंकू शर्माच्या पाठीत खुपसलेला खंजीर नव्हे, तर ती खोटी धर्मनिरपेक्षता आहे ! – माजी आमदार कपिल मिश्रा

श्री. कपिल मिश्रा

देहलीमध्ये धर्मांधांकडून रिंकू शर्माच्या पाठीत जो खंजीर खुपसण्यात आला, तोे खंजीर किंवा सुरा नाही, तर ती खोटी धर्मनिरपेक्षता आहे, हे आपल्याला समजले पाहिजे. आज आपण जागृत झालो नाही, तर उद्या अशी स्थिती आपल्यावरही आल्याखेरीज रहाणार नाही. देहलीच्या रिंकू शर्माने श्रीरामाचे कार्य करत असतांना प्राण दिला. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या साहाय्य करणे, हे आमचे दायित्व आहे. हे लक्षात घेऊन त्याच्या कुटुंबाला आम्ही २ दिवसांमध्ये ५२ लाख रुपये गोळा करून दिले. ५०० वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत श्रीराममंदिर होत आहे. जगात असे प्रथमच घडले असेल की, इस्लामी आक्रमणात उद्ध्वस्त करण्यात आलेले श्रद्धास्थान परत त्या ठिकाणी उभारण्यात येत आहे.

देशातील अनेक समस्यांचे मूळ धर्मनिरपेक्षतेमध्ये आहे ! – चेतन गाडी

चेतन गाडी

भारत एक स्वयंभू हिंदु राष्ट्र आहे. आज देशात निर्माण झालेल्या समस्यांचे मूळ धर्मनिरपेक्षतेमध्ये आहे. धर्मनिरपेक्षता हा शब्द राज्यघटनेतून काढून त्या ठिकाणी ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द स्थापित करणे, आमचे मुख्य ध्येय असले पाहिजे. गुरुकुल नष्ट करून आम्ही मेकॉलेची शिक्षणव्यवस्था स्वीकारली. या व्यवस्थेत आमचे स्वत:चे असे काहीच नाही. आम्ही आजही गुलाम आहोत, हे समजून घेतले पाहिजे. या व्यवस्थेच्या ठिकाणी हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक बळ अंगी निर्माण केले पाहिजे.

क्षणचित्रे

१. धर्मांधांनी हत्या करण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या समवेत नुकत्याच ठार मारण्यात आलेल्या रिंकू शर्माचे फ्लेक्स छायाचित्र सभास्थळी लावण्यात आले होते. त्या ठिकाणी असलेल्या २ रिक्त जागा पाहून माजी आमदार कपिल शर्मा म्हणाले, ‘‘या जागा आपल्यासाठी खाली सोडण्यात आल्या आहेत.’’

२. या कार्यक्रमासाठी राजस्थान, फरीदाबाद, देहली, उत्तरप्रदेश, झारखंड, गोवा अशा विविध ठिकाणांहून लोक आले होते.

३. सभेच्या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांचे प्रदर्शन, तसेच हिंदु राष्ट्र आणि धर्मावरील आघात या विषयांवर प्रदर्शन लावण्यात आले होते.

४. सभास्थळी सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

५. वक्त्यांचे स्वागत तुळशीचे रोप देऊन करण्यात आले.

६. एक हिंदुत्वनिष्ठ म्हणाले की, मी प्रथमच हिंदु जनजागृती समितीचे भाषण ऐकत आहे. मला आपल्या कार्यात सहभागी व्हायचे आहे. तुम्ही आमचे मार्गदर्शक बना, आम्ही कार्य करण्यासाठी सिद्ध आहोेत.

७. एक हिंदुत्वनिष्ठ अभिप्राय व्यक्त करतांना म्हणाले की, समितीच्या कार्यकर्त्यांना पाहून पुष्कळ आनंद आणि उत्साह जाणवतो. तुम्ही लोक काहीतरी वेगळे आहात.’