बुद्धीप्रामाण्यवाद ते विश्‍वबुद्धीकडून ज्ञान मिळणे यातील टप्पे

बुद्धिप्रामाण्यवाद

१. बौद्धिक स्तरावरील विरोधक

‘जोपर्यंत मनुष्याची बुद्धी तमप्रधान असते, तोपर्यंत त्याच्या मनात धर्म किंवा अध्यात्म यांच्याविषयी जिज्ञासा जागृत होत नाही. तसेच त्याला धर्म किंवा अध्यात्म यांच्याविषयीचे ज्ञान समजत नाही. अशी व्यक्ती नास्तिक असते किंवा ती धर्मद्रोही असते. काही वेळा धर्म किंवा अध्यात्म यांच्याविषयी खरोखर जाणून घेण्याची वृत्ती नसून केवळ धर्माला किंवा अध्यात्माला विरोध करण्यासाठी काही बुद्धीवादी लोक प्रश्‍न विचारतात आणि बौद्धिक स्तरावर तर्क-वितर्क करून विश्‍लेषण करण्याचा प्रयत्न करतात अन् ते केवळ विरोधासाठी विरोध करतात. अशांची बुद्धी तामसिक आणि अत्यंत बहिर्मुख असत. तसेच ते अहंकारी असतात. त्यांना ‘तामसिक जिज्ञासू’ न म्हणता ‘बौद्धिक स्तरावरील विरोधक’ म्हणतात. बुद्धीप्रामाण्यवादी हे बौद्धिक स्तरावरील विरोधक असून ते धर्म आणि अध्यात्म यांना बौद्धिक स्तरावर विरोध करण्याचे काम करतात.

२. जिज्ञासूंचे प्रकार

२ अ. रासजिक जिज्ञासू : जेव्हा मनुष्याची बुद्धी रज-सत्त्व प्रधान होते, तेव्हा मनुष्याच्या मनात त्याच्या जीवनातील विविध घटनांमागील विविध कारणे शोधण्याची जिज्ञासा जागृत होते. या कारणांचा अभ्यास करतांना जेव्हा त्याच्या बुद्धीची सात्त्विकता वाढते, तेव्हा त्याच्या मनात धर्म किंवा अध्यात्म यांच्याविषयी बौद्धिक स्तरावरील जिज्ञासा थोड्याफार प्रमाणात जागृत होते. अशी व्यक्ती धर्म किंवा अध्यात्म यांच्याशी संबंधित विविध प्रश्‍न विचारून किंवा विविध ग्रंथांचे किंवा लेखांचे वाचन करून स्वत:च्या मनातील शंकांचे निरसन करून घेण्याचा प्रयत्न करते. अशा व्यक्तीच्या मनाचा नास्तिकतेकडे असणारा कल हळूहळू न्यून होऊ लागतो आणि तिच्या मनात ‘बुद्धीच्याही पलीकडे एक विश्‍व आहे’, याची जाणीव निर्माण होऊ लागते. अशा व्यक्ती राजसिक जिज्ञासू असतात.

२ आ. सात्त्विक जिज्ञासू : जेव्हा व्यक्तीची बुद्धी सत्त्व-रज प्रधान होते, तेव्हा तिला धर्म किंवा अध्यात्म यांच्याशी संबंधित विविध ग्रंथ किंवा लेख यांतील ज्ञानाचे आकलन होऊ लागते अन् तिच्याकडून धर्माचरण किंवा तात्कालिक साधना करणे, अशा कृती होऊ लागतात. त्यामुळे तिला प्राथमिक स्तराच्या थोड्याफार अनुभूती येऊ लागतात. त्यामुळे अशा व्यक्तीचा धर्म किंवा अध्यात्म यांच्यावरील विश्‍वास वाढून ती आस्तिक होऊ लागते. अशा व्यक्तीला ‘सात्त्विक जिज्ञासू’ म्हणतात.

२ इ. प्रासंगिक साधना करणारा जिज्ञासू : धर्माचरण आणि साधना यांच्या थोड्याफार कृतींतून येणार्‍या अनुभूतींमुळे व्यक्तीला अधिकाधिक धर्माचरण अन् साधना करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे तिच्याकडून धर्माचरण आणि साधना सलग काही दिवस किंवा मास (महिने) होऊ लागते आणि तिला धर्म अन् अध्यात्म यांचे प्रायोगिक स्तरावरील ज्ञान थोड्याफार प्रमाणात मिळू लागते. त्यामुळे तिच्या मनात धर्म आणि अध्यात्म यांच्यावरील विश्‍वास अधिक दृढ होऊ लागतो. अशा व्यक्तीला ‘प्रासंगिक साधना करणारा जिज्ञासू’ म्हणतात.

३. साधक

यानंतरच्या टप्प्याला बुद्धी पूर्णपणे सात्त्विक झालेली असते आणि या टप्प्याला व्यक्ती धर्म किंवा अध्यात्म यांची सत्यता बुद्धीच्या स्तरावर पडताळून न पहाता अनुभूतीच्या स्तरावर सतत अनुभवत असते. त्यामुळे तिच्या मनातील बुद्धीचा अडथळा निघून जातो आणि ती धर्म किंवा अध्यात्म यांतील सूक्ष्म जगताचे ज्ञान सहजतेने ग्रहण करू शकते. अशी व्यक्ती खर्‍या अर्थाने साधक झालेली असते.

४. शिष्य

यापुढच्या टप्प्याला साधकाची साधना सांगणार्‍या गुरूंवर श्रद्धा अधिक बळकट होऊ लागते आणि तो गुर्वाज्ञेचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याच्या मनाचा लय होऊन तो ‘शिष्य’ पदाला पोचतो. शिष्यावस्था प्राप्त झाल्यावर साधकाची बुद्धी अधिक प्रगल्भ होते आणि त्याच्या मनातील बुद्धीचा अडथळा पूर्णपणे जाऊन त्याला ‘गुरूंचे शब्द हेच प्रमाण’, वाटत असल्यामुळे त्याला गुरूंच्या मनातील विचार न सांगता कळतात. त्यामुळे त्याच्याकडून गुरूंना अपेक्षित अशी साधना सुरळीतपणे चालू रहाते.

५. संत

या नंतरच्या टप्प्याला शिष्याचा कारणदेह, म्हणजे बुद्धी सूक्ष्म झाल्याने तो गुरूंच्या कारणदेहाशी एकरूप होऊ लागतो आणि संतपदाला पोचतो. त्यामुळे संतांना भूत, वर्तमान आणि भविष्य या काळांशी संबंधित सूक्ष्मतर विचार ग्रहण करता येऊ लागतात. त्यांना धर्म आणि अध्यात्म यांचे ज्ञान बाह्य माध्यमांतून प्राप्त न होता आतूनच प्राप्त होऊ लागते. तसेच त्यांना गुरुवचनांचा भावार्थही समजू लागतो. अशा प्रकारे संतांचा मनोलय होऊन त्यांच्या बुद्धीलयाची प्रक्रिया चालू होते. संतपदावर आरूढ झाल्यावर व्यक्तीला विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांतील भूत, वर्तमान आणि भविष्य या काळांशी संबंधित सूक्ष्मतम विचार ग्रहण होऊ लागतात. त्यामुळे संतांमध्ये जिज्ञासू, साधक आणि शिष्य यांना अध्यात्मात पुढे नेण्यासाठी अचूक मार्गदर्शन करण्याची क्षमता असते; परंतु संत इतरांना मार्गदर्शन करून शिष्य घडवत नसतील, तर ते केवळ ‘संत’ या पदाला असतात.

६. गुरु

संत केवळ वैयक्तिक स्तरावर ईश्‍वरप्राप्तीचे प्रयत्न न करता, जेव्हा जिज्ञासू, साधक आणि शिष्य यांना अध्यात्मात पुढे नेण्यासाठी त्यांना अचूक मार्गदर्शन करू लागतात, म्हणजे विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांतून ग्रहण होणार्‍या विचारांनुसार कृती करतात, तेव्हा ते गुरुपदावर आरूढ होतात. अशा संतांची प्रकृती व्यष्टी असेल, तर ते व्यष्टी स्तरावरील मार्गदर्शन करतात आणि समष्टी असेल, तर ते समष्टी स्तरावरील मार्गदर्शन करतात. व्यष्टी-समष्टी अशी संमिश्र प्रकृती असेल, तर ते व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरांवर साधक अन् शिष्य यांना मार्गदर्शन करतात.

७. विरोधक, जिज्ञासू, साधक, शिष्य, संत आणि गुरु

कु. मधुरा भोसले

८. जिज्ञासूवृत्ती ही बुद्धीच्या सात्त्विकतेची प्रक्रिया घडवून आणण्यासाठी महत्त्वाची असणे आणि त्यानुसार जिज्ञासूचा आध्यात्मिक प्रवास प्रथम साधक, नंतर शिष्य अन् शेवटी संत किंवा गुरु या स्तरापर्यंत होणे शक्य असणे

जिज्ञासूवृत्ती ही बुद्धीच्या सात्त्विकतेची प्रक्रिया घडवून आणण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे मनुष्य जिज्ञासूच्या टप्प्याला असतांना धर्म किंवा अध्यात्म यांचे ज्ञान प्रथम बुद्धीने जाणून घेऊन त्यानुसार कृती करत गेला की, त्याची बुद्धी सात्त्विक होऊन तो प्रथम साधक, नंतर शिष्य आणि शेवटी संत किंवा गुरु या स्तरापर्यंत पोचू शकतो अन् हा आध्यात्मिक प्रवास करतांना त्याची बुद्धी केव्हा गळून पडते, याची त्याला जाणीवही होत नाही. मनुष्य शिष्यपदाला पोचल्यावर त्याच्या मनात स्वत:च्या बुद्धीवरील विश्‍वास न्यून होऊ लागतो आणि ज्ञानमार्गी शिष्य असल्यास धर्मग्रंथांवरील अन् भक्तीमार्गी शिष्य असल्यास गुरुवचनांवरील श्रद्धा अधिक वाटू लागते. अशा प्रकारे व्यक्तीच्या मनातील बुद्धीप्रामाण्यावरील विश्‍वास न्यून होऊन शब्दप्रमाणावरील विश्‍वास वाढून त्याची आध्यात्मिक उन्नती होते.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१२.२०१८, रात्री १०.४५)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.